दुसऱ्या वर्षीही आषाढी वारीवर कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:03+5:302021-06-19T04:22:03+5:30

कळंब : ‘कधी होईल भेट, कधी मिळेल नजर, तुझ्या अंगणात कधी करू, हरिनामाचा गजर’ अशीच भावना यंदाही आषाढी ...

Corona crisis on Ashadhi Wari for the second year in a row | दुसऱ्या वर्षीही आषाढी वारीवर कोरोनाचे संकट

दुसऱ्या वर्षीही आषाढी वारीवर कोरोनाचे संकट

googlenewsNext

कळंब : ‘कधी होईल भेट, कधी मिळेल नजर,

तुझ्या अंगणात कधी करू, हरिनामाचा गजर’ अशीच भावना यंदाही आषाढी वारीसाठी पंढरपूरला न जाऊ शकणाऱ्या वारकऱ्यांची झाली असेल. कळंबमार्गे दरवर्षी शंभर सव्वाशेच्या घरात जातील एवढ्या लहानमोठ्या दिंड्या पंढरपूरकडे पायी जातात. परंतु, मागील वर्षीप्रमाणे कोरोनाने यंदाही या दिंड्यांचे दर्शन कळंबकरांना होणार नसल्याने हा भक्तीचा महिना सुनासुना वाटतो आहे.

समाधानकारक पाऊस पडला तर पेरण्या करून नाहीतर घरातील इतर सदस्यांवर जबाबदारी टाकून आषाढी वारीनिमित्त नित्यनेमाने अनेक वारकरी पंढरपूर गाठतात. दरवर्षी पंढरपूरला पायी वारीला जाणाऱ्या विविध दिंड्या कळंबमार्गे जातात. आषाढी एकादशीच्या जवळपास एक महिना आधी या दिंड्या त्यांच्या मूळ गावातून निघतात. कळंब येथे पोहोचल्यानंतर पुढे सात ते आठ दिवसात पंढरपूर गाठायचे असे त्यांचे नियोजन असते. मागील वर्षी दिंड्यांची ही वर्षानुवर्षे चालणारी परंपरा कोरोना प्रादुर्भावामुळे खंडित झाली. यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे व तिसऱ्या लाटेच्या भीतीने शासनाने वारीच रद्द केल्याने सलग दुसऱ्यावर्षी वारकरी आणि विठ्ठल यांची मुखामुखी भेट होणार नाही.

दरवर्षी आषाढी एकादशीसाठी कळंबमार्गे जवळपास शंभर ते सव्वाशे लहानमोठ्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. यातील अनेक दिंड्यांना मोठी परंपरा आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्हा वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील बहुतांश वारकरी कळंबमार्गे पंढरपूर गाठतात. विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यातील जवळपास सर्वच दिंड्या कळंबमार्गे जातात.

ज्ञानदेव-तुकारामाचा गजर करीत भक्तीत तल्लीन होऊन निघालेल्या या वारकऱ्यांमुळे कळंब शहरात तसेच या मार्गावरील गावातही भक्तिमय वातावरण असते. अनेक ठिकाणी मुक्काम, भोजन व पहाटे भजन-कीर्तन करून हे वारकरी पुढे प्रस्थान करतात. यावर्षीही तो सत्संग घडणार नसल्याने भाविकांनाही चुकल्यासारखे वाटणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थानची दिंडी ही आषाढी वारीसाठी जाणारी सर्वात जास्त वारकरी असलेली दिंडी असते. दरवर्षी कळंब येथे मुक्कामी असलेल्या या दिंडीतील संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे हजारो भक्त दर्शन घेतात. मागील आणि यावर्षीही दिंड्यांना परवानगी नसल्याने महाराजांचे दर्शन होणार नसल्याची खंत भाविकांना आहे.

चौकट -

पालखी मार्ग तयार, वारकरीच नाहीत

विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच संत श्री गजानन महाराज व श्री विठ्ठल यांना जोडणारा खामगाव ते पंढरपूर हा पालखी मार्ग म्हणून ओळखला जाणारा भाग आता चौपदरीकरणासह राष्ट्रीय महामार्ग म्हणून जवळपास पूर्ण झाला आहे. हरिनामात तल्लीन असलेल्या वारकऱ्यांनी या मार्गावरील चिखल तुडवीत, खड्ड्याचा अडथळा पार करीत अनेक वर्षे पंढरी गाठली. आता हा रस्ता चौपदरीकरणामुळे व्यवस्थित झाला आहे. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे पंढरपूरमध्ये ‘नो एन्ट्री’ असल्याने वारकरी वारीसाठी निघालेच नाहीत. त्यामुळे पालखी मार्ग झाला पण वारकरीच नाहीत, असे चित्र सध्या दिसत आहे.

७० वर्षांची परंपरा खंडित

कळंब येथील जुन्या सोनार गल्लीतील बंडोपंत दशरथ यांची वारकऱ्यांना अन्नदानाची ७० वर्षाची परंपरा आहे. दरवर्षी आषाढी वारीसाठी जाणाऱ्या ५८ दिंड्यांतील जवळपास ५ हजार वारकऱ्यांची दशरथ कुटुंब जेवणाची व्यवस्था करते. मध्य प्रदेशातील २ तर विदर्भातील गोंदिया, नागपूर, यवतमाळ, अमरावती या भागातील दिंडीतील वारकरी कळंब येथे दशरथ कुटुंबीयांच्या अन्न सेवेचा लाभ घेतात. प्रत्येक दिंडीतील एक सदस्य दोन दिवस आधी येऊन दिंडीतील वारकऱ्यांची संख्या आदींबाबत माहिती देतो. त्याप्रमाणे व्यवस्था केली जाते, असे पंडित दशरथ यांनी सांगितले. मागच्या वर्षी व यंदाही ही परंपरा खंडित झाल्याने काहीतरी राहून गेले, अशी भावना झाल्याचेही दशरथ म्हणाले.

कॅप्शन -

कळंब शहरातून जाणारा खामगाव -पंढरपूर हा पालखी मार्ग जवळपास पूर्ण झाला आहे. मात्र, ज्या वारकरी मंडळीमुळे दरवर्षी आषाढी वारीदरम्यान हा मार्ग गजबजतो तो यंदा सुनासुना वाटतो आहे.

Web Title: Corona crisis on Ashadhi Wari for the second year in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.