३० शिक्षकांच्या नियुक्तीचा चेंडू ‘ग्रामविकास’च्या काेर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST2021-02-15T04:28:23+5:302021-02-15T04:28:23+5:30
उस्मानाबाद : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या गुरुजींना नियुक्ती देण्यावरून निर्माण झालेला पेच स्थानिक स्तरावर सुटला नाही. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी ...

३० शिक्षकांच्या नियुक्तीचा चेंडू ‘ग्रामविकास’च्या काेर्टात
उस्मानाबाद : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या गुरुजींना नियुक्ती देण्यावरून निर्माण झालेला पेच स्थानिक स्तरावर सुटला नाही. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निर्णयाचा चेंडू थेट राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या काेर्टात टाेलविला आहे. यासंदर्भात दाेन-तीन दिवसांत निर्णय येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने शासन आदेश काढल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने जवळपास ३२ ते ३५ शिक्षक साधारपणे सप्टेंबरमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे रुजू झाले. परंतु, संबंधित प्रवर्गाच्या रिक्त जागा, ऑनलाइन भरलेली माहिती आदी मुद्यांच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित झाल्यानंतर शिक्षण विभागने त्यांना शाळांवर नियुक्ती देण्यास नकार दिला. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत तसेच शिक्षण समितीच्या बैठकीत खडाजंगीही झाली. मात्र, प्रशासनाने संबंधित गुरुजींना शाळांवर पाठविण्यास असमर्थता दर्शविली. या सर्व घडामाेडीत साडेचार ते पाच महिन्यांचा कालावधी लाेटला. दरम्यान, स्थानिक पातळीवर निर्णय घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिक्षण विभागाने राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले आहे. दरम्यान, या अनुषंगाने काही दिवसांपूर्वीच ग्रामविकास मंत्र्यांसाेबत सीईओंची बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून तीन-चार दिवसांत मार्गदर्शन प्राप्त हाेईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
चाैकट...
१५ दिवसांपूर्वी मागितले मार्गदर्शन
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने साधारपणे १५ दिवसांपूर्वी मार्गदर्शन मागविले आहे. या अनुषंगाने ग्रामविकास मंत्र्यांसाेबत ‘झेडपी’च्या वरिष्ठ अधिका-यांची चर्चा झाली आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती मार्गदर्शनाची. मार्गदर्शन पाॅझिटिव्ह आल्यास सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या गुरुजींच्या नियुक्तीचा मार्ग माेकळा हाेणार आहे.
पाॅइंटर...
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना उस्मानाबाद जिल्हा परिषदेने रुजू करून घेतले नाही. यानंतर लातूर, अहमदनगर, बीड या जिल्हा परिषदांकडूनही अशाच स्वरूपाची पावले उचलण्यात आली हाेती. त्यांनीही ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले हाेते. नगर जिल्हा परिषदेला मार्गदर्शन मिळताच रुजू करून घेण्याची प्रक्रिया पार पाडली गेली. उस्मानाबाद ‘झेडपी’लाही दाेन-चार दिवसांत मार्गदर्शन मिळेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.