तुळजापुरात प्राचीन तीर्थकुंडच हडपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST2021-07-31T04:33:21+5:302021-07-31T04:33:21+5:30

उस्मानाबाद : तुळजापूर येथील प्राचीन माहात्म्य असलेला एक अख्खा तीर्थकुंडच काहींनी हडप करून त्यावर खासगी बांधकाम सुरू केले होते. ...

An ancient shrine was seized in Tuljapur | तुळजापुरात प्राचीन तीर्थकुंडच हडपला

तुळजापुरात प्राचीन तीर्थकुंडच हडपला

उस्मानाबाद : तुळजापूर येथील प्राचीन माहात्म्य असलेला एक अख्खा तीर्थकुंडच काहींनी हडप करून त्यावर खासगी बांधकाम सुरू केले होते. या प्रकाराची माहिती कळताच चौकशी लावण्यात आली होती. त्यात बनवेगिरीने हा तीर्थकुंड खासगी व्यक्तीच्या नावे झाल्याचे निष्पन्न होताच यात सहभागी सर्वांवर फौजदारी कारवाईचे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

तुळजापूर या ऐतिहासिक शहरात अनेक प्राचीन माहात्म्य असलेली स्थळे आहेत. कालौघात अशी स्थळे नष्ट होत चालली आहेत. मंकावती तीर्थकुंड हे त्यापैकीच एक. दुर्लक्षित असलेल्या या तीर्थकुंडावर काही स्थानिकांनी बनवेगिरी करीत ते आपल्या मालकीचे असल्याचे भासवून नावावर करून घेतले. हा प्रकार लक्षात येताच जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी चौकशी लावली होती. तुळजापूरचे तहसीलदार व पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी कागदपत्रांची तपासणी केली असता तीर्थकुंडावर मूलतः पालिकेची मालकी असल्याचे दिसून आले. तसा अहवाल त्यांनी २९ जुलैला सादर केला. यानंतर लागलीच जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी याप्रकरणी बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच हा तीर्थकुंड लगेच मूळ आखीव पत्रिकेच्या आधारे शासन खाती नोंद घ्यावी व ते जमा करून घ्यावे, तसेच कुंडाच्या मूळ बांधकामात काही बदल केला गेल्यास पुरातत्व विभागाने ते करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.

काय आहे कुंडाची महती...

१२४४ चौरस मीटर आकाराच्या या भव्य मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण, तुळजाई माहात्म्य व देवीविजय पुराणात आढळून येतो. विष्णुभक्त श्री गौतम यांनी तुळजापुरी आल्यानंतर त्यांनी तो बांधल्याचा दाखला पुराणात आहे. तीर्थकुंडात मोठा जलाशय असून, मधोमध श्री महंकाळेश्वराची पिंड आहे. बाजूला ३८ ओवऱ्या आहेत. संपूर्ण तीर्थ घडीव दगडी बांधकामाचे आहे.

-तर होणार गुन्हे दाखल...

जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऐतिहासिक संदर्भ असलेली स्थळे आहेत. अशी स्थळे कोणी खासगी व्यक्तींनी हडपली असल्यास नागरिकांनी त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास द्यावी, हडप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला आहे.

Web Title: An ancient shrine was seized in Tuljapur