कारवाईदरम्यान पळून जाणाऱ्या लाचखोर पीआयला एसीबीच्या पथकाने पाठलाग करून पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 17:30 IST2025-06-27T17:23:26+5:302025-06-27T17:30:01+5:30

लाच घेताना पकडल्यानंतर कारवाई सुरू असतानाच नजर चुकवून लाचखोर पीआयने पळ काढला.

ACB team chases and catches fleeing bribe-taking PI | कारवाईदरम्यान पळून जाणाऱ्या लाचखोर पीआयला एसीबीच्या पथकाने पाठलाग करून पकडले

कारवाईदरम्यान पळून जाणाऱ्या लाचखोर पीआयला एसीबीच्या पथकाने पाठलाग करून पकडले

धाराशिव : एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून ९५ हजारांची लाच घेणारा धाराशिव ग्रामीण ठाण्याचा पोलिस निरीक्षक मारुती शेळके कारवाईदरम्यान वर्दळीच्या रस्त्याने पळून जात होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करीत त्यास बार्शी रोडवरून ताब्यात घेतले. गुरुवारी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

धाराशिव शहरातील एका तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर धाराशिव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. यातील एका आरोपीच्या नातेवाइकाकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस निरीक्षक शेळके याने दोन लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ९५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार बुधवारी शासकीय विश्रामगृहावर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने तक्रारदार नातेवाइकाकडून ९५ हजार रुपये स्वीकारले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला कर्मचाऱ्यास रंगेहाथ ताब्यात घेऊन पोलिस निरीक्षक मारुती शेळके यासही ताब्यात घेतले. कारवाई सुरू असतानाच नजर चुकवून त्याने पळ काढला. वर्दळीच्या बार्शी रोडवरून हातगाडे, वाहनांच्या आडून जात असताना लेडीज क्लबसमोर पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.

घरांची झडती सुरू
लाचखोर मारुती शेळके व महिला कर्मचारी मुक्ता लोखंडे यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शेळके याच्या नांदेडच्या काबरानगरमधील व धाराशिव येथील भाड्याने राहणाऱ्या घराची झडती घेतली जात आहे. यामध्ये अद्याप काहीच हाती लागले नसल्याचे लाचलुचपतचे उपअधीक्षक योगेश वेळापुरे म्हणाले..

Web Title: ACB team chases and catches fleeing bribe-taking PI