गुन्हेगारास अटक न करण्यासाठी घेतली २० हजारांची लाच; पोलीस नाईक रंगेहाथ अटकेत
By बाबुराव चव्हाण | Updated: August 4, 2022 18:03 IST2022-08-04T18:02:04+5:302022-08-04T18:03:11+5:30
तक्रारदाराकडे २५ हजार रूपये लाचेची मागणी केली हाेती मात्र, तडजाेडीअंती २० हजार रूपये देण्याचे ठरले.

गुन्हेगारास अटक न करण्यासाठी घेतली २० हजारांची लाच; पोलीस नाईक रंगेहाथ अटकेत
उस्मानाबाद -वीस हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाेहारा पाेलीस ठाण्यातील पाेलीस नाईक गाेराेबा इंगळे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई ४ ऑगस्ट राेजी सकाळी करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, लाेहारा पाेलीस ठाण्यात तक्रारदाराविरूद्ध गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या गुन्ह्यात त्यांना अटक न करणे, लाॅकअपमध्ये न टाकणे, चार्जशीट न पाठविणे, यासाठी पाेलीस नाईक गोरोबा इंगळे यांनी तक्रारदाराकडे ३ ऑगस्ट राेजी २५ हजार रूपये लाचेची मागणी केली हाेती. तडजाेडीअंती २० हजार रूपये देण्याचे ठरले हाेते. मात्र, लाच देण्याची त्यांना इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीतील सत्यता पडताळून ४ ऑगस्ट राेजी सकाळी लाेहारा-जेवळी राेडवरील एका पेट्राेलपंप परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला. यावेळी पाेना इंगळे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून २० हजार रूपये लाच स्वीकारली असता पथकाने त्यांना रंगेहात पकडले. सापळा अधिकारी म्हणून पाेलीस उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी काम पाहिले. पथकामध्ये पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमूगले, विष्णू बेळे, जाकेर काझी यांचा समावेश हाेता.