तरुणाची गोळी झाडून हत्या; रोहा पोलिसांकडून एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 15:49 IST2021-04-28T15:40:40+5:302021-04-28T15:49:06+5:30
Youth shot dead : इंदरदेव धामणसई येथील घटना

तरुणाची गोळी झाडून हत्या; रोहा पोलिसांकडून एकाला अटक
मिलिंद अष्टीवकर
रोहा तालुक्यातील धामणसई इंदरदेव येथील कार्ले डोंगरात एका तरुणाची गावठी बंदुकीने गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आज (28 एप्रिल) सकाळी एकाला अटक करण्यात आली आहे.
25 एप्रिल रोजी रात्री 9 ते 26 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. गणपत देवजी शिद (वय 28 वर्षे, रा. इंदरदेव, पो.धामणसई, ता. रोहा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची बहिण बाली गणपत हंबीर हिने रोहा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
गणपत शिद याची गावठी बंदुकीने गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी इंदरदेव येथील राजू बाळू शिद याला रोहा पोलिसांनी आज सकाळी अटक केली असून, त्याने गणपतला का मारले? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात हत्येसह शस्त्र अधिनियम, 1959 चे कलम 3, 25, 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास रोह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर करीत आहेत.