नाशिक रोड येथील गोरेवाडी भागात युवकाचा धारदार शस्त्राने खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 05:29 IST2025-10-03T05:29:19+5:302025-10-03T05:29:54+5:30
नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत गोरेवाडी भागात एका युवकाचा कुरापत काढून धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. २) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक रोड येथील गोरेवाडी भागात युवकाचा धारदार शस्त्राने खून
नाशिक : शहर व परिसरात खुनाचे सत्र सुरूच असून नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत गोरेवाडी भागात एका युवकाचा कुरापत काढून धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. २) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. कृष्णा दीपक ठाकरे (वय २४) असे मृताचे नाव आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडी भागात कृष्णा याच्यावर तिघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवीला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला जखमी अवस्थेत जवळच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळाने त्यास शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून कृष्णा यास मयत घोषित केले. याप्रकरणी मध्यरात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मारेकरी फरार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मागील नऊ महिन्यांत शहरात ४२ खून झाले आहेत. ऑक्टोबर महिन्याची सुरुवातदेखील खुनाच्या घटनेने झाली. दुसऱ्याचदिवशी पून्हा एका युवकाचा खून झाल्याने आता खुनाच्या घटनांचा आकडा ४३वर पोहचला आहे.