ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:35 IST2025-10-27T09:32:04+5:302025-10-27T09:35:07+5:30
दिल्ली पोलिसांनी स्वस्त आयफोनचं आमिष दाखवून लोकांना फसवणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे.

ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
दिल्लीपोलिसांनी स्वस्त आयफोनचं आमिष दाखवून लोकांना फसवणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. अमन असं आरोपीचं नाव आहे, तो हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहे. तो सोशल मीडियावर स्वस्तात आयफोन देणार असं सांगून लोकांना फसवत होता. आरोपीने आतापर्यंत चॅट्स, खोट्या पेमेंट लिंक्स आणि खोट्या अकाउंट्सद्वारे लोकांची ८ ते ९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, अमन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटी अकाउंट्स तयार करत असे आणि कमी किमतीत आयफोन विकण्याचं आमिष दाखवून लोकांना फसवत होता. लोक त्याच्या पेजला भेट देत असत आणि स्वस्त डील पाहत असत. स्वस्त असल्याने लोक त्यांच्या जाळ्यात फसत. पण नंतर अमन असा सापळा रचायचा ज्यातून कोणीही सुटू शकत नव्हतं. एका व्यक्तीने आरोप केला आहे की, आरोपीने टॅक्स आणि शिपिंगबाबत खोटी आश्वासनं दिली आणि २९ UPI ट्रान्झेक्शनद्वारे ६५,७८२ रुपये लुटले.
पैसे मिळताच आरोपीने संपर्क साधणं आणि रिप्लाय देणं बंद केलं. त्यानंतर व्यक्तीने दिल्लीपोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी फोन नंबर आणि डिजिटल व्यवहारांचा शोध घेऊन नेटवर्क ट्रॅक केलं. पोलीस तपासात हिसारमधला रजिस्टर्ड मोबाईल नंबर सापडला. नंबर ट्रॅकिंग केल्यानंतर पोलिसांना अमन सापडला, त्याला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.
आरोपीकडून दोन फोन, तीन डेबिट कार्ड आणि असंख्य डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान अमनने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी बनावट प्रोफाइल तयार केल्याचं आणि लोकांना बनावट चॅट, एडिट केलेले फोटो आणि बनावट UPI लिंक पाठवल्याचं त्याने उघड केलं. बारावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या अमनने स्थानिक सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे तंत्र शिकलं.
पोलिसांनी ट्रॅक करू नये म्हणून पैसे मिळताच तो अनेक बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करायचा. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, अमन आणि त्याच्या गँगने एकूण ८ ते ९ लाख रुपयांची फसवणूक केली. अमनचे इतर साथीदार, शाकीर, आमिर खान, गोडू, जगदीश आणि गुलशन फरार आहेत. पोलीस त्यांचं लोकेशन शोधत आहेत. त्यांना शंका आहे की, हे जाळं मोठं असू शकते आणि ते चौकशी करत आहेत.