धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरला; उपचारादरम्यान झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 21:55 IST2021-08-22T21:51:03+5:302021-08-22T21:55:43+5:30
A young woman who slipped and fell : साताऱ्यातील खासगी रुग्णालयात शनिवारपासून श्वेतावर उपचार सुरू होते.

धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरला; उपचारादरम्यान झाला मृत्यू
सातारा : कास पठार परिसरातील एकीव धबधब्यात पाय घसरल्याने जखमी झालेल्या श्वेता मुकुंद साठे (वय १८, रा. गोडोली, सातारा) या तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील काही मैत्रिणी शनिवारी एकीव येथील धबधबा पाहण्यासाठी गेल्या होत्या. धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेत असताना श्वेता साठे ही तरुणी निसरड्या दगडावरून पाय घसरून कोसळली. ४० फूट खोल असलेल्या दगडावर ती आदळल्याने गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
साताऱ्यातील खासगी रुग्णालयात शनिवारपासून श्वेतावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी रात्रीच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.