Young man killed by beading with sharp-edged weapon in Beed | बीडमध्ये दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या

बीडमध्ये दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या

ठळक मुद्देजुन्या वादातून हल्ला झाल्याचा संशय

बीड: येथील बालेपीर भागात जुन्या वादाच्या कारणावरून एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. सय्यद साजेद अली असे मृताचे नाव असून ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान नगररोडवरील या मुख्यरस्त्यावर घडली. मृतावर 4 वर्षांपूर्वी देखील जुन्या वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सैनिकी शाळेत शिक्षक असणारा सय्यद साजेद अली हा युवक बालेपीर भागात राहतो. आज दुपारी नमाज नंतर नगररोडवरील एका हॉटेलमध्ये तो मित्रांसोबत चहा घेत होता. दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान अचानक चार ते पाचजण धारधार शस्त्रासह तेथे आले. त्यांनी काही कळायच्या आत सय्यद साजेद अलीवर हल्ला करत धारदार शस्त्राने सात ते आठ वार केले. हल्ला होताच  हॉटेलमधील सर्वांनी तेथून पळ काढला. गंभीर वार झाल्याने सय्यद अली रक्ताच्या थारोळ्यात हॉटेलमध्ये पडला असता हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. 

घटनेची माहिती मिळताच जवळच राहणाऱ्या सय्यद अली याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. यावेळी मोठी गर्दी जमली असून पोलीसांनी बंदोबस्त वाढवला आहे. 

दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपाधीक्षक भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी भारत राऊत, शिवाजी नगर पोलीस स्थानकाचे शिवलाल पुरभे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांचे श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.

Web Title: Young man killed by beading with sharp-edged weapon in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.