पुलावर दुचाकी थांबवली, मोबाईल काढून ठेवला अन्..; मांजरा नदीपात्रामध्ये उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
By राजकुमार जोंधळे | Updated: June 18, 2025 21:57 IST2025-06-18T21:54:30+5:302025-06-18T21:57:03+5:30
एका २८ वर्षीय तरुणाने लातूर-नांदेड महामार्गावरील भातखेडा पुलावरून मांजरा नदीपात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुलावर दुचाकी थांबवली, मोबाईल काढून ठेवला अन्..; मांजरा नदीपात्रामध्ये उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
उदगीर शहरात आडत दुकानावर मुनीम म्हणून काम करणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने लातूर-नांदेड महामार्गावरील भातखेडा पुलावरून मांजरा नदीपात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. मयत तरुणाचा मृतदेह शाेधण्याला सायंकाळच्या सुमारास यश आले. कपील उद्धव शिंगडे (रा. पेठेवाडी ता. देवणी) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, कपिल उद्धव शिंगडे हा उदगीर शहरातील एका आडत दुकानावर मुनीम म्हणून काम करत हाेता. दरम्यान, बुधवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास लातूर-नांदेड महामार्गावरील भातखेडा येथील पुलावर त्याने आपली दुचाकी थांबवली. त्यानंतर खिशातील माेबाइल काढून ठेवला. विषाचा डबाही दुचाकीनजीक ठेवला आणि मांजरा नदीपात्रामध्ये उडी मारली. ही घटना रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या काही वाहनधारकांनी पाहिली. पुलावरून तरुणाने उडी मारल्याची माहिती भातखेडा ग्रामस्थांना दिली.
याबाबत पाेलिस पाटलांनी लातूर ग्रामीण ठाण्याचे पाेलिस निरीक्षक अरविंद पवार यांना तातडीने कळविले. घटनास्थळी पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत मृतदेहाचा शाेध सुरू केला. वाहत्या पाण्यामध्ये मृतदेह वाहून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानुसार ग्रामस्थांच्या मदतीने पाेलिसांनी शाेध माेहीम सुरू केली. सायंकाळपर्यंत शाेध घेतल्यानंतर मयत तरुणाचा मृतदेह दगडी पुलानजीक नदीपात्रामध्ये आढळून आला. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एम. इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आकस्मित मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तपास बीट अंमलदार पोहेकाॅ. पाटील हे करीत आहेत.
घटनास्थळी आढळली दुचाकी, माेबाइल आणि विषाचा डबा...
घटनास्थळी मयताची दुचाकी, माेबाइल आणि विषाचा डबा आढळून आला आहे. तरुणाने विष प्राशन केले हाेते का? हे मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. उत्तरीय तपासणीमध्ये तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला असल्याचे शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले, असे पाेलिस निरीक्षक अरविंद पवार म्हणाले.