Workers' death by falling from the 16th floor at the construction project palce | बांधकाम प्रकल्पात १६ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू
बांधकाम प्रकल्पात १६ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू

ठळक मुद्देजेपी नॉर्थ इन्फ्रा या बांधकाम प्रकल्पात काम करत असताना १६ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू झाला आहे. त्याची पत्नी ८ महिन्यांची गर्भवती आहे.

मीरारोड - काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत वेस्टर्न हॉटेलमागे सुरु असलेल्या जेपी नॉर्थ इन्फ्रा या बांधकाम प्रकल्पात काम करत असताना १६ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू झाला आहे. त्याची पत्नी ८ महिन्यांची गर्भवती आहे. या प्रकरणी विकासकासह सर्वसंबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मजुर संघटनेने केली आहे.

हाटकेशवरुन वेस्टर्न हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर जेपी नॉर्थ इन्फ्रा या विकासकाचे मोठे बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु आहे. सदर प्रकल्पात मजुर काम करणारा रबीउल मंडल (२३) हा तरुण काम करत असताना १६ व्या मजल्यावरुन खाली पडण्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. १६ व्या मजल्यावरुन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पालिकेच्या जोशी रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात त्याचा मृतदेह ठेऊन आज शवविच्छेदन करण्यात आले. पोलीसांनी सुरवातीला अपघाती मृत्युची नोंद केल्या नंतर तपास सुरु केला. दरम्यान या घटनेने बांधकाम प्रकल्पा ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा बेल्ट आदीची खबरदारी घेतली न गेल्याने मंडलचा बळी गेल्याचे मजुर संघटनेचे अ‍ॅड. किशोर सामंत यांनी सांगीतले. विकासका सह सर्व संबंधित यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी आणि मजुराच्या नातलगांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सामंत यांनी केली. १४ जुलै रोजी याच परिसरात सुरु असलेल्या रवी बिल्डरच्या बांधकाम प्रकल्प ठिकाणी ११ व्या मजल्यावरुन पडून मोहम्मद झुल्फीकार रहमान मलिक (२५) या मजुराचा बळी गेला होता. पोलीसांनी त्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. परंतु सततच्या घडणाऱ्या या घटनांमुळे मजुरांच्या जीविताला धोका वाढला असून विकासकांसह बांधकाम ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी मजुरांनी केली आहे. मंडल यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीसांनी कार्यवाही सुरु केली असून विकासकासह संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी सांगितले. 

Web Title: Workers' death by falling from the 16th floor at the construction project palce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.