तो डॉक्टर नव्हे हैवान...! डॉक्टर पतीने घटस्फोटासाठी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही विषाणू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 12:24 IST2018-11-30T11:48:13+5:302018-11-30T12:24:00+5:30
डॉक्टर असलेल्या पतीने विवाहितेच्या शरीरात चक्क एचआयव्हीचे विषाणू सोडल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथे उघडकीस आला आहे.

तो डॉक्टर नव्हे हैवान...! डॉक्टर पतीने घटस्फोटासाठी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही विषाणू
वाकड : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करूनही अवास्तव पैशांची मागणी पूर्ण होत नसल्याने घटस्पोट मिळविण्यासाठी डॉक्टर असलेल्या पतीने विवाहितेच्या शरीरात चक्क एचआयव्हीचे विषाणू सोडल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथे उघडकीस आला आहे.
याप्रकरणी २७ वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती उमेश रामायण विश्वकर्मा, सासरे रामायण विश्वकर्मा, सासु पार्वती रामायण विश्वकर्मा (रा. सर्वजन. एकता कॉलनी, पडवळ नगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फौजदार संगीता घोडे यांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी महिलेचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता त्यानंतर कुटुंबातील पती-सासू, सासरे यांनी व्यवसाय करण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला त्यापैकी काही पैसे मिळविले देखील मात्र पैसे मिळत असल्याने त्यांच्या मागणीचा आकडा वारंवार वाढतच गेल्याने अखेर फिर्यादी महिलेने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे आरोपींनी शिवीगाळ मारहाण करून पैसे मिळत नसल्याने तिचा घटस्फोटासाठी मानसिक शारीरिक छळ सुरू करण्यात आला.
पीडितेचा पती एका खाजगी रुग्णालयात डॉक्टरकीची प्रॅक्टिस करतो.दरम्यान ती महिला आठ महिन्यापूर्वी आजारी असताना उपचाराच्या बहाण्याने तीच्या सलाईनमध्ये एचआयव्हीचे विषाणू सोडले. यामुळे त्या महिलेला एचआयव्हीची बाधा झाली आहे.
सर्व तोपरी प्रयत्न करून रुग्णाचे जीव वाचविनाऱ्या डॉक्टरला सर्वजण देवाचा अवतार असल्याची उपमा देतात मात्र थेरगावमध्ये घडलेल्या डॉक्टरच्या हैवानी कृत्याने सर्वजण संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.