चाळीत पसरली होती दुर्गंधी; घर उघडून पाहतात तर आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 19:04 IST2021-08-23T19:03:43+5:302021-08-23T19:04:52+5:30
A woman's body was found :अंबरनाथ शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा परिसरात एका बंद घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

चाळीत पसरली होती दुर्गंधी; घर उघडून पाहतात तर आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अंबरनाथ शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा परिसरात एका बंद घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.
भागुबाई चाळीत काही दिवसांपूर्वी मृत महिला आणि एक व्यक्ती भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होते. मात्र हे घर बंद होते शिवाय त्यातून दुर्गंधी येत असल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान घरमालकाने नागरिकांच्या मदतीने टाळा तोडून खोलून पाहिले असता, या महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याने तात्काळ याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली.
या महिलेचा पती हा या घटनेनंतर फरार झाला असून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नराळे पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी घटनास्थळी भेट दिली. आता या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले असून ही हत्या आहे की आणखी काय याचा छडा लावून आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांसमोर उभे राहिले आहे.सदर मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.