चित्रपट पाहून झाली पोलीस कॉन्स्टेबल, लोकांना धमकावून उकळायची पैसे, 'असा' झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 12:03 IST2024-09-26T11:51:43+5:302024-09-26T12:03:53+5:30
पूजा असं आरोपी महिलेचं नाव आहे. पूजा हेड कॉन्स्टेबल असल्याचं सांगून परिसरातील लोकांना धमकावत असे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशच्या सहारनपूर पोलिसांनी एका बनावट महिला पोलिसाला अटक केली आहे. पूजा असं आरोपी महिलेचं नाव आहे. पूजा हेड कॉन्स्टेबल असल्याचं सांगून परिसरातील लोकांना धमकावत असे. चौकशीत पूजाने सांगितलं की, चित्रपट आणि वृत्तपत्रांमध्ये पोलिसांचं काम पाहून तिने वर्दी घातली आणि लोकांना धमकावून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी आरोपी पूजाकडून गणवेश जप्त केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिची जेलमध्ये रवानगी केली आहे. या प्रकरणी एसपी सागर जैन यांनी सांगितलं की, या महिलेबद्दल अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या की, एक महिला पोलीस असल्याची बतावणी करून देवबंद परिसरात फिरत आहे आणि लोकांना धमकावत आहे.
तक्रार मिळाल्यानंतर देवबंद पोलीस ठाण्याने तपास सुरू केला आणि पोलीस गणवेशात फिरत असताना महिलेला अटक केली. ही महिला पोलिसांचा गणवेश आणि चप्पल घालून फिरत होती, असं पोलिसांनी सांगितलं. अटकेनंतर महिलेने सांगितलं की, तिने स्थानिक बाजारातून खाकी कापड आणलं होतं आणि पोलिसांसारखा गणवेशही शिवला.
गणवेश घालून ती फिरू लागली आणि लोकांना धमकावून पैसे उकळू लागली. बनावट पोलीस कर्मचारी बनून कायद्याचं उल्लंघन करणं हा गंभीर गुन्हा आहे. लोकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे आणि अशा व्यक्तींबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवा, असं पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.