पत्नीची हत्या केल्यानंतर गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन करणार होते आत्महत्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 18:41 IST2019-08-03T18:36:03+5:302019-08-03T18:41:37+5:30
पत्नीच्या आजाराला कंटाळून तिचा गळा चिरुन खुन करुन ते आत्महत्त्या करण्यासाठी घराबाहेर पडले होते.

पत्नीची हत्या केल्यानंतर गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन करणार होते आत्महत्या...
वानवडी : पत्नीच्या आजाराला कंटाळून तिचा गळा चिरुन खुन करुन आत्महत्या करण्यासाठी घरातुन निघुन गेलेल्या हरविंदर सिंग बिंद्रा (वय ७८) यांना शनिवारी सकाळी कँम्प येथील गुरुद्वार येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वानवडीतील केदारीनगर भागातील फ्लाँवर व्हँली सोसायटी मधील लोटस बिंल्डीग मध्ये राहत असलेल्या देविंदर कौर बिंद्रा (वय ६६ वर्ष) यांच्या आजाराला कंटाळून पती हरविंदर सिंग बिंद्रा यांनी धारदार शस्त्राने पत्नीचा खुन केला व पत्नीच्या आजारपणाला कंटाळून तिचा खुन केला असून कोणालाही जबाबदार न धरता मी सुध्दा आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून निघून गेले होते.
आरोपीचा शोध घेण्यासाठी बातमीदारांना कळवून वाँट्सअप व फेसबुक वरुन फोटोसह माहिती प्रसारीत करण्यात आली होती. शनिवारी सकाळी आरोपी हरविंदरसिंग बिंद्रा हे कँम्प मधील गुरुद्वार येथे आल्याची बातमी बातमीदारांनी त्वरीत वानवडी पोलीस स्टेशनला कळवून राजू रासगे व तपास पथक गुरुद्वारला रवाना झाले व आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीला घडलेल्या घटनेविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पत्नीच्या ३० वर्षांपासून आजाराला कंटाळलो होतो. त्यामुळे पत्नीचा गळा कापुन खुन केला. त्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनवर प्लँटफाँर्म ५ वर जावून रेल्वेखाली आत्महत्या करायची होती. परंतु, धाडस झाले नाही व वाटले की एकदा कँम्प मधील गुरुद्वार येथे जावून दर्शन घेऊन आत्महत्या करावी म्हणून दर्शन घेण्यासाठी आलो होतो. दर्शन घेतल्यावर आत्महत्या करणार होतो असे सांगितले.
सदरची कारवाई वानवडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.