पत्नीची हत्या करुन ४ वर्षे फरार असलेल्या पतीला अटक; LPG सिलेंडर बुक करताच मिळालं लोकेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:39 IST2026-04-01T13:38:34+5:302026-04-01T13:39:02+5:30
पंजाब पोलिसांनी एका माजी कॅप्टनला पत्नीच्या हत्येप्रकरणी ४ वर्षांनंतर अटक केली आहे.

AI फोटो
पंजाबपोलिसांनी एका माजी कॅप्टनला पत्नीच्या हत्येप्रकरणी ४ वर्षांनंतर अटक केली आहे. संदीप तोमर असं या आरोपीचं नाव असून त्याला मध्यप्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं. पोलीस आरोपीच्या बँक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवून होतं. याच दरम्यान त्याने एक एलपीजी (LPG) सिलेंडर बुक केला, ज्यावरून पोलिसांनी त्याचा मागोवा घेत त्याला अटक केली. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याची शिक्षा कायम ठेवली होती, त्यानंतर आरोपी फरार झाला होता.
संदीप तोमरच्या सासरच्या मंडळींनी त्याच्या अटकेची मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर या तपासाला गती आली. आरोपीला पकडण्यासाठी एसपी आसवंत सिंह यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली. एसआयटीने 'नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड'च्या मदतीने तपास केला आणि आरोपीचे खरे पॅन कार्ड शोधून काढलं. या पॅन कार्डच्या आधारे त्याच्या बँक खात्यांची माहिती मिळवण्यात आली. तपासात पोलिसांना आरोपीच्या एका बँक खात्याचा शोध लागला.
सापळा रचून केली अटक
बँक खात्याच्या तपासणीत असं समोर आलं की, एक खासगी कंपनी दरमहा त्याच्या खात्यात पगार जमा करत होती. या बँक खात्याशी एक मोबाईल नंबरही लिंक होता, ज्यावरून आरोपी पांढुर्णा जिल्ह्यात असल्याचं स्पष्ट झालं. बँक स्टेटमेंटची अधिक चौकशी केली असता, पोलिसांना 'भारत गॅस'च्या एका सिलिंडरसाठी केलेल्या पेमेंटची माहिती मिळाली. पोलिसांनी गॅस एजन्सीशी संपर्क साधला असता, ज्या भाड्याच्या घरात गॅसची डिलिव्हरी झाली होती, त्याचा पत्ता मिळाला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
२०१४ मध्ये केली होती पत्नीची हत्या
मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने आरोपीला आता पंजाबमध्ये परत आणण्यात आलं आहे. अटकेच्या भीतीने तो देशाच्या विविध भागांत लपून राहत होता. आरोपी संदीप तोमर '१२ बिहार रेजिमेंट'मध्ये कार्यरत होता. २०१४ मध्ये त्याने आपली पत्नी श्वेता हिची गळा दाबून हत्या केली होती आणि हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा बनाव रचला होता. या प्रकरणी त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, तसेच त्याला बडतर्फ करून फिरोजपूर जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. २०१९ मध्ये त्याला जामीन मिळाला होता, मात्र २०२२ मध्ये उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा कायम ठेवल्याने तो फरार झाला होता.