विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी पत्नीने पतीला तडफडून मारले; चेहऱ्यावर टाकली मिरची पूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 19:50 IST2021-10-19T19:48:52+5:302021-10-19T19:50:13+5:30
Murder Case : या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी पत्नीने पतीला तडफडून मारले; चेहऱ्यावर टाकली मिरची पूड
भोपाळ - इंदूरमध्ये पती - पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारे प्रकरण समोर आले आहे. जिथे पत्नीने तिच्या विवाहबाह्य संबंधात अडथळा आणणाऱ्या पतीला आपल्या मार्गातून काढून टाकले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
मृत व्यक्ती कॉल सेंटरमध्ये काम करत असे
या महिलेने तिच्या प्रियकरासह आणि त्याच्या मदतीने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आकाश मिडकिया हा इंदूर येथील एका कॉल सेंटरमध्ये कामाला होता. त्याचवेळी त्याची पत्नी वर्तिका एका खासगी रुग्णालयात काम करायची. तिचे तिचा सहकारी असलेल्या मनीष शर्मासोबत अवैध संबंध होते. जेव्हा पती आकाशला वर्तिका आणि मनीषच्या अवैध संबंधांबद्दल कळले तेव्हा तो खूप दुखावला. पतीने पत्नीला मनीषपासून दूर राहण्यास सांगितले, तेव्हा संतापलेल्या पत्नीने त्याला ठार मारण्यासाठी कट रचला.
आरोपींची युक्ती चालली नाही
१३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हत्येच्या या प्रकरणात एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी वर्तिका आणि मनीष यांनी जितेंद्र वर्मा, अर्जुन मंडलोई आणि अंकित पवार यांचाही या कटात समावेश केला. आकाश बायकोला एलआयजी स्क्वेअरवर सोडल्यानंतर परतत होता. मग अर्जुन आणि अंकितने त्याला थांबवले आणि त्याच्या चेहऱ्यावर मिरचीची पूड टाकली. यानंतर त्यांनी आकाशला चाकूने भोकसले.
पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपींनी पोलिसांपासून पळ काढण्यासाठी आपले केस कापले आणि दाढी देखील कापली होती. हे प्रकरण उलगडण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळापासून ९० किमीच्या अंतरावर असलेल्या १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, त्यानंतर आरोपींना पोलिसांनी पकडले.