"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:02 IST2025-10-16T15:01:02+5:302025-10-16T15:02:03+5:30
चिमुकल्या लेकाने हत्येचं रहस्य उघड करत आपल्या आईचा पर्दाफाश केला आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका पत्नीने एका ई-रिक्षा चालकाला एक लाख रुपये देऊन आपल्याच पतीची हत्या केली. कोणाला संशय येऊ नये म्हणून अपघात झाल्याचं दाखवलं. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. महिलेच्या चिमुकल्या लेकाने हत्येचं रहस्य उघड करत आपल्या आईचा पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी जेव्हा लहान मुलाला जवळ घेतलं आणि त्याच्याशी प्रेमाने संवाद साधला तेव्हा मुलाने "पप्पांना मारलं आहे... " असं सांगितलं. बाराबंकीतील घुंगटर पोलीस स्टेशन परिसरात ही संपूर्ण घटना घडली. दोन दिवसांपूर्वी हनुमंतलाल पत्नी पूजा आणि मुलांसह एका जत्रेला गेला होता. पण जत्रेतून परत येत असताना रस्त्यावर त्याचा मृतदेह सापडला. पत्नीने पोलिसांना सांगितलं की तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांना तिच्यावर संशय आला आणि त्यांनी कसून चौकशी केली.
चौकशीदरम्यान समोर आलेल्या सत्याने पोलिसांनाही मोठा धक्का बसला. पत्नी पूजाचे तिच्याच भाच्याशी प्रेमसंबंध होते. घरात वाद वाढू लागल्याने पत्नीने तिच्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती लखनौमध्ये राहणाऱ्या ई-रिक्षा चालक कमलेशला भेटली आणि पतीला मारण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानंतर त्याने हनुमंतलालची हत्या केली.
एएसपी विकास चंद्र त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंतलालच्या मुलाने दिलेल्या माहितीमुळे हत्येचा उलगडा झाला. सध्या पोलिसांनी पूजा आणि कमलेश दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्याकडून हत्येत वापरलेला लोखंडी रॉड, मोबाईल आणि ई-रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.