'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 08:54 IST2025-10-20T08:54:07+5:302025-10-20T08:54:46+5:30
दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचे गुप्तांग अज्ञात व्यक्तीने कापल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. रात्री झोपेत असताना त्याच्यासोबत हे कृती कुणी केले, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

AI Generated Image
दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचे गुप्तांग अज्ञात व्यक्तीने कापल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. रात्री झोपेत असताना त्याच्यासोबत हे कृती कुणी केले, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. अखेर पोलिसांनी या रहस्याचा उलगडा केला. प्रेमसंबंधात फसवणूक आणि लग्नाला नकार दिल्याच्या प्रकरणातून ही घटना घडली. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये वहिनीने आपल्या सख्ख्या बहिणीचा सूड घेण्यासाठी थेट दिराचे गुप्तांगच कापल्याची थरारक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी वहिनी फरार झाली आहे. दीड तासाच्या शस्त्रक्रियेनंतर दिराचे प्राण वाचले असून, पोलीस फरार वहिनीचा कसून शोध घेत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
प्रयागराज जिल्ह्यातील मऊआइमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलखानपूर येथील रहिवासी उमेश याचा गेल्या तीन वर्षांपासून त्याची वहिनी मंजूच्या सख्ख्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी एकत्र आयुष्य जगण्याची आणि लग्न करण्याची स्वप्ने पाहिली होती. उमेशने प्रेयसीला लग्नाचे वचनही दिले होते. घरच्यांनाही या प्रेमाबद्दल माहिती होती, पण गेल्या तीन महिन्यांपूर्वी अचानक उमेशने लग्नाला नकार दिला. 'आपण दुसऱ्याच कोणावर प्रेम करतो आणि तिच्याशीच लग्न करणार' असल्याचे त्याने घरच्यांना सांगितले. यामुळे प्रेयसी नैराश्यात गेली आणि तिने आत्महत्येची धमकी दिली होती.
रात्री २ वाजता बदला!
दिराने बहिणीला दिलेला हा धोका वहिनीला चांगलाच खुपला. बहिणीला झालेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी तिने एक भयानक योजना आखली. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री जवळपास २ वाजताच्या सुमारास उमेश आपल्या खोलीत झोपलेला असताना वहिनी मंजू चाकू घेऊन त्याच्या खोलीत घुसली. दिरावर सुमारे चार वार करून तिने त्याचे गुप्तांग कापले आणि घटनास्थळावरून ती लगेच पसार झाली.
दीड तासाच्या ऑपरेशननंतर जीव वाचला
गुप्तांग कापल्यामुळे वेदनेने तडफडणाऱ्या उमेशचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला एसआरएन ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने हालचाल करत उमेशवर जवळपास दीड तास शस्त्रक्रिया केली, ज्यानंतर त्याचा जीव वाचू शकला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार वहिनीचा कसून शोध सुरू केला आहे. प्रेमात मिळालेल्या धोक्याचा असा भयानक बदला घेतल्याच्या या घटनेने संपूर्ण प्रयागराज हादरले आहे.