वाझे प्रकरणातील तपासाधिकारी अनिल शुक्लांची बदली, ज्ञानेंद्र वर्मा एनआयएचे नवे आयजीपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 07:13 IST2021-04-13T04:20:51+5:302021-04-13T07:13:14+5:30
Anil Shukla transfer : एनआयएकडून गेल्या महिनाभरात शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली उद्याेगपती मुकेेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

वाझे प्रकरणातील तपासाधिकारी अनिल शुक्लांची बदली, ज्ञानेंद्र वर्मा एनआयएचे नवे आयजीपी
- जमीर काझी
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाबरोबरच राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेल्या स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) विशेष महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना मिझोरामला पाठविले असून त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. शुक्ला यांनी स्फोटक कार प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
एनआयएकडून गेल्या महिनाभरात शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली उद्याेगपती मुकेेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत सचिन वाझे, विनायक शिंदे, नरेश गोर व रियाझुद्दीन काझी यांना अटक करण्यात आली आहे. वाझेच्या अटकेनंतर राज्यात मोठी उलथापालथ झाली आहे. मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे सीबीआय या प्रकरणाचा तपास करीत असून देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.
एनआयएचे आयजी अनिल शुक्ला हे मिझोराम केडरचे अधिकारी आहेत. ते गेल्या सहा वर्षांपासून महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर होते. स्फोटक कार प्रकरणापूर्वीच शुक्ला यांची बदली झाली होती, मात्र त्यांना महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, शुक्ला हे राज्यात प्रतिनियुक्तीवर आले होते व त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नियमानुसार त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.