जायचे होते बालाघाट; रामगढवाल्याने दाखविला हात 

By नरेश डोंगरे | Updated: December 14, 2024 21:39 IST2024-12-14T21:38:10+5:302024-12-14T21:39:28+5:30

रोख आणि मोबाईल लंपास : रेल्वे पोलिसांची तत्परता, दोन तासात ठोकल्या आरोपीला बेड्या

Wanted to go to Balaghat; Ramgarhwala showed his hand | जायचे होते बालाघाट; रामगढवाल्याने दाखविला हात 

जायचे होते बालाघाट; रामगढवाल्याने दाखविला हात 

 - नरेश डोंगरे

नागपूर : त्याला बालाघाटला जायचे होते. त्यासाठी तो रेल्वे स्थानकावर पोहचला. मात्र, टून्न असल्याने गाडीत बसण्याऐवजी फलाटावरच झोपला. झिंग उतरल्यानंतर त्याला त्याचा मोबाईल आणि खिशातील सर्वच्या सर्व पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी लगेच धावपळ करून चोरट्याचा माग काढला अन् त्याला रामगढमधून अटक केली.

फिर्यादीचे नाव भाकचंद पटले (वय ४४) असून तो बोतवा, तिरोडी (बालाघाट) येथील रहिवासी आहे. तो दारूच्या नशेत असल्याचे पाहून त्याला हिसका दाखविणाऱ्या चोरट्याचे नाव जब्बार रहिम खान (वय ३९, रा. रामगढ, कामठी) असे आहे. पटलेला बालाघाटला जायचे होते. त्यामुळे शुक्रवारी दुपारी १.३० वाजता कामठी रेल्वे स्थानकावर आला. 'ओव्हरडोज'मुळे त्याला स्वत:ला सावरता येत नव्हते. 

परिणामी फलाट क्रमांक १ वरच्या आसनावर तो आडवा झाला. काही वेळेनंतर त्याची झिंग उतरल्याने त्याने स्वत:चे खिसे तपासले. खिशातील सर्वच्या सर्व सुमारे एक हजार रुपये आणि मोबाईल चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे रेल्वे पोलिसांकडे त्याने चौकशी केली. पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही तपासून चोरट्याचा माग काढला. त्यानंतर दोन तासातच आरोपी जब्बार खानला अटक केली.

आरोपी सराईत, वरिष्ठांकडून प्रशंसा
आरोपी जब्बार खान हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तक्रार मिळताच त्याचा दोन तासात छडा लावल्याबद्दल लोहमार्ग पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांनी ईतवारीचे ठाणेदार पंजाबराव डोळे तसेच हवालदार जयकांत गायकवाड, कर्मचारी शैलेश मेश्राम सतिश इंगळे यांची प्रशंसा केली.

Web Title: Wanted to go to Balaghat; Ramgarhwala showed his hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.