परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:19 IST2025-12-01T15:17:21+5:302025-12-01T15:19:21+5:30
दिल्ली स्फोटातील 'व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचा धक्कादायक खुलासा; डॉ. शाहीन सईद बनली ८ वर्षांनी लहान डॉ. मुजम्मिलची बेगम

परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
दिल्लीस्फोटाच्या कटाला पूर्णत्वास नेणाऱ्या डॉक्टर्सच्या दहशतवादी मॉड्यूलची मुख्य सदस्य डॉ. शाहीन सईद हिच्याबद्दल चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एकेकाळी बुरखा नाकारणाऱ्या आणि परदेशी जीवनाच्या स्वप्नात रंगणाऱ्या या महिलेला तिच्या तिसऱ्या पतीने कट्टरतेच्या मार्गावर आणले आणि ती थेट जैश-ए-मोहम्मदच्या महिला ब्रिगेडमध्ये सामील झाली. मात्र, तीनदा लग्न करूनही तिची एक मोठी इच्छा अपूर्णच राहिली.
दोन पतींना सोडले, तिसरा निघाला दहशतवादी!
चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. शाहीन ही याच मॉड्यूलचा दुसरा आरोपी डॉ. मुजम्मिल याची बेगम आहे. स्वतःपेक्षा ८ वर्षांनी लहान असलेल्या मुजम्मिलसोबत निकाह करण्यापूर्वी शाहीनने तिच्या पहिल्या दोन पतींना घटस्फोट दिला होता.
तिचा पहिला निकाह नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. जफर हयात यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुलेही झाली. मात्र, ९ वर्षांनी २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. डॉ. जफर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यात कधीच भांडण झाले नाही, पण शाहीनला परदेशातील चांगली नोकरी आणि झगमगाट खूप आकर्षित करत होता. युरोप किंवा ऑस्ट्रेलियाला जाण्याची तिची इच्छा होती, पण जफर यांनी भारतातच राहणे पसंत केले.
डॉ. जफरपासून घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी तिने गाझियाबादमधील एका कापड व्यावसायिकाशी निकाह केला, पण तिचे ते नातेही फार काळ टिकले नाही आणि तिने काहीच महिन्यात दुसऱ्या पतीलाही घटस्फोट दिला.
त्यानंतर फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात काम करत असताना तिची भेट डॉ. मुजम्मिलशी झाली. याच विद्यापीठाजवळच्या मशिदीत सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांनी निकाह केला. सूत्रांनुसार, मुजम्मिलनेच तिला धार्मिक कार्यात सक्रिय केले आणि हळूहळू कट्टरतेच्या मार्गावर नेले.
'अशी' बनली जैशची लेडी ब्रिगेड
शाहीन लहानपणापासूनच हुशार विद्यार्थिनी होती आणि तिने अलाहाबादमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. तिचा पहिला पती डॉ. जफर यांनी सांगितले की, शाहीनने निकाह वगळता कधीही बुरखा घातला नाही. तिला परदेशी जीवनशैली आणि चांगले उत्पन्न खुणावत होते.
पण मुजम्मिलच्या प्रेमात पडल्यानंतर आणि त्याच्या संपर्कात आल्यावर ती इतकी कट्टरपंथी बनली की, ती जैश-ए-मोहम्मदची महिला विंग 'जमात उल-मोमिनात'मध्ये सामील झाली. डॉक्टर असल्याचा फायदा घेत ती गुपचूप दहशतवादी कारवायांना पुढे नेत होती. तिने जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआर आणि हरियाणातील अनेक ठिकाणी फंड जमा केला होता आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी लाखो रुपये पुरवले होते.
तीन पासपोर्ट असूनही 'ती' इच्छा अपूर्णच!
शाहीनला परदेशात जाण्याची किती तीव्र इच्छा होती, हे तिच्याकडे असलेल्या तीन पासपोर्टवरून स्पष्ट होते. तिने वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या पत्त्यावर हे पासपोर्ट बनवले होते. सूत्रांनुसार, दिल्लीत स्फोट घडण्यापूर्वी ती परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होती. मुजम्मिलच्या अटकेनंतर तर तिला तातडीने देश सोडायचा होता. मात्र, पासपोर्टसंबंधी काही औपचारिकता पूर्ण न झाल्यामुळे तिची ही इच्छा अपूर्ण राहिली आणि ती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली.