विटा : कर्नाटकातील चिक्कमंगरूळ जिल्ह्यातील निकसे शहरातील शिवमूर्ती शेषप्पा गौडा यांच्या घरातून सुमारे दीड कोटी रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास करून पलायन करणाऱ्या तीन परप्रांतीय चोरट्यांना विटा पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले.राजेंद्र शेर बम (३०), एकेंद्र कटक बडवाल ( ३१) व करणसिंग बहादूर धामी (३४, सर्व रा. आर.एस. धांगेडी, जिल्हा कैलाली, देश नेपाळ) अशी त्यांची नावे आहेत. भिवघाटात सकाळी ८ वाजता ही मोठी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी १ कोटी ५० लाख ३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.कर्नाटकच्या चिक्कमंगरूळ जिल्ह्यातील निकसे शहरातील शिवमूर्ती शेषप्पा गौडा यांच्या घरातून तिघा परप्रांतीय चोरट्यांनी चोरी करण्याचे ठरवले. दि. २० ऑगस्ट रोजी भरदिवसा १ किलो २०१ गॅम ७९० मिली वजनाचे चांदीचे दागिने तसेच १ किलो ८०२ गॅम ३८० मिली वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे १ कोटी ५० लाख ३ हजार १६५ रुपये किमतीचे दागिने लंपास करून पलायन केले.दागिने चोरून पलायन करणारे संशयित परप्रांतीय चोरटे हे एका पांढऱ्या रंगाच्या मोटारमधून (केए ५३ एबी ५४६६) विटा पोलिस ठाणे हद्दीतून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील व पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने विटा ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावर भिवघाटजवळ सापळा लावला.कर्नाटकातील पासिंग असलेली मोटार जवळून पुढे गेल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी त्या मोटारीचा पाठलाग करून मोटर थांबवली. त्यानंतर मोटारीतील तीन परप्रांतीयांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी कर्नाटकातून दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच सोने-चांदी दागिन्यांची पिशवी पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी पोलिसांनी सुमारे दीड कोटी रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले.
तिघांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देणार चोरट्यांना पकडल्यानंतर विटा पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला. तिघा चोरट्यांना ताब्यात घेतल्याचे कळवले. तिघा परप्रांतीय संशयितांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक विपुल पाटील व निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली.