वाल्मीक कराड, सुदर्शन घुले दोघे सराईत गुन्हेगार; खंडणी, हाफ मर्डरचे भरपूर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:53 IST2025-01-06T13:51:58+5:302025-01-06T13:53:05+5:30

आता मोक्कांतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू

Valmik Karad, Sudarshan Ghule, two inmate criminals; Many crimes of extortion, half murder | वाल्मीक कराड, सुदर्शन घुले दोघे सराईत गुन्हेगार; खंडणी, हाफ मर्डरचे भरपूर गुन्हे

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले दोघे सराईत गुन्हेगार; खंडणी, हाफ मर्डरचे भरपूर गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : मस्साजोग सरपंच हत्या, दोन कोटी रुपये खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह इतर आठ जणांवर खंडणी, हाफ मर्डरसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. घुलेविरोधात यापूर्वीही अपहरण केल्याची नोंद आहे. यावरून हे सर्व गुन्हेगार सराईत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यामध्ये सुदर्शन घुलेसह आठ आरोपी आतापर्यंत निष्पन्न झाले आहेत. तर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडसह तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास सध्या सीआयडी करत आहे. आतापर्यंत या गुन्ह्यांत आठ आरोपींना अटक केली असून, ते सर्व सीआयडी कोठडीत आहेत. हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर विशेष नजर ठेवली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन

हिवाळी अधिवेशनात या प्रकरणावरून गदारोळ झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची ग्वाहीसुद्धा दिली होती. या सर्वांची गुन्हे दाखलची माहिती पोलिसांनी काढली असून, या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

वाल्मीक कराडला शासकीय बॉडीगार्ड

वाल्मीक कराडविरोधात १५ गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याला शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे. तसेच दोन शासकीय बॉडीगार्डही आहेत. तीन महिन्यांसाठी त्याने ९ लाख ७२ हजार रुपये शुल्कही भरले होते. आता २५ जानेवारी रोजी याची मुदत संपणार होती, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

वाल्मीक कराड अस्वस्थ

  • पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यास खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड याची बीड शहर पोलिस ठाण्यात सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
  • या चौकशीदरम्यान कराड अस्वस्थ होत आहे. शनिवारी रात्री ११ वाजता वाल्मीक कराड यास तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • पाठीत जास्त दुखत असल्याचे कराड याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सानप यांनी तपासणी करून त्याला गोळ्या, औषध दिले. बीडमध्ये लॉकअपमध्ये ठेवण्यात आले.


कोणावर किती गुन्हे?

  • सुदर्शन घुले    १९
  • वाल्मीक कराड   १५
  • कृष्णा आंधळे    ६
  • महेश केदार    ६
  • प्रतीक घुले    ५
  • जयराम चाटे    ३
  • विष्णू चाटे   २
  • सुधीर सांगळे    २

Web Title: Valmik Karad, Sudarshan Ghule, two inmate criminals; Many crimes of extortion, half murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.