धक्कादायक! भावाला वाचवण्यासाठी आपल्याच 10 वर्षीय मुलीची केली हत्या; पोटात भोसकला चाकू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 17:51 IST2022-12-06T17:51:17+5:302022-12-06T17:51:41+5:30
उत्तर प्रदेशातून नात्याला काळीमा फासणारी अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! भावाला वाचवण्यासाठी आपल्याच 10 वर्षीय मुलीची केली हत्या; पोटात भोसकला चाकू...
पिलीभीत:उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमधून वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अनम नावाच्या 10 वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. 3 डिसेंबर रोजी ही मुलगी शेतात गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. तिच्या पोटावर खोल जखमा होत्या आणि आतडेही बाहेर आले होते. सुमारे अर्धा तास त्रास सहन केल्यानंतर कुटुंबासमोरच मुलीचा मृत्यू झाला.
वडील, काका आणि आजोबा अटकेत
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांचा नातेवाईक शकीलवर हत्येचा आरोप केला होता, मात्र आता पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनमचे वडील अनीसने आपला भाऊ शादाबला बलात्काराच्या आरोपापासून वाचवण्यासाठी आपल्याच मुलीची निर्घृण हत्या केली. वडील अनीस, काका शादाब आणि आजोबा शेहजादे यांनी शत्रुत्वाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नेमकं काय झालं?
2019 मध्ये मृतक मुलगी अनमचा मामा शादाब गावाजवळ राहणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला होता. हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले तेव्हा मुलीच्या कुटुंबाने नकार दिला. खूप सांगूनही घरच्यांनी ऐकले नाही, शेवटी शादाबने त्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केले. मुलगी पारशी समाजाची होती, यामुळे मुलीचा भाऊ शकील याने लग्नाला विरोध केला होता. त्या दिवसापासून दोन्ही कुटुंबात वैर होते. दरम्यान, शकीलने शादाबविरोधात पत्नीवर बलात्कार केल्याची तक्रार न्यायालयात दाखल केली.
नुकतेच या प्रकरणी न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आले. यानंतर शादाबच्या कुटुंबीयांना आपल्या मुलाला वाचवण्याची काळजी वाटू लागली. शादाब आणि आजोबा शेहजादे यांना काय करावे काही समजत नव्हते. शेवटी त्यांनी अनमची हत्या करुन, शकीलला हत्येत गोवण्याचा कट रचला. यातून शकीलवर शादाबविरुद्धच्या बलात्कार प्रकरणात तडजोड करण्यासाठी दबाव टाकण्याची योजना होती. या घृणास्पद घटनेत मुलीचे वडील अनीस यानेही त्यांना साथ दिली.
मुलीच्या हत्येचा कट इथूनच सुरू होतो
वडील अनीस, काका शादाब आणि आजोबा शेहजादे यांनी महिनाभरापूर्वी अनमच्या हत्येची योजना आखली होती. मुलीच्या हत्येमागील सूत्रधार काका शादाब आणि आजोबा होते. तर, भावाला वाचवण्यासाठी मुलीचे वडीलही या कटात सामील झाले. मुलगी पुन्हा होऊ शकते, पण भाऊ तुरुंगात गेला तर कुटुंब विस्कळीत होईल, असा समज त्यांना होता. त्यामुळेच तिघांनी मिळून 10 वर्षीय निष्पापाची निर्घृण हत्या केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने हा प्रकार उघडकीस आणला आहे.