18 महिन्यांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, मृतदेह संदुकात लपवला; अल्पवयीन आरोपी अटकेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:58 IST2025-10-15T12:57:56+5:302025-10-15T12:58:19+5:30
Uttar Pradesh Crime: हत्येचे कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का..!

18 महिन्यांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, मृतदेह संदुकात लपवला; अल्पवयीन आरोपी अटकेत...
Uttar Pradesh Crime:उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 12वीत शिकणाऱ्या एका तरुणाने शेजाऱ्याच्या 18 महिन्यांच्या बालकाची निर्दयपणे हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे.
असा झाला घटनेचा उलगडा
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील नित्यानंद नंगली गावातील रहिवासी पुष्पेंद्र यांचा मुलगा माधव (वय 18 महिने) संध्याकाळी अचानक घरातून गायब झाला. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही. शेवटी त्यांनी पोलिसांना कळवले.
मृतदेह चादरीत गुंडाळून संदुकात ठेवला
पोलिसांनी तपास सुरू केला असता, शेजारी राहणाऱ्या एका तरुणावर संशय आला. तपासादरम्यान जे दृश्य समोर आले, ते अंगावर काटा आणणारे होते. पोलिसांना त्या तरुणाच्या घराची झाडाझडती घेतली असता, चादरीत गुंडाळलेला बालकाचा मृतदेह सापडला. आरोपीने तो मृतदेह संदुकात लपवून ठेवला होता.
सर्वांसमोर शोधण्याचे नाटक केले
अधिक धक्कादायक बाब म्हणजे, बालक बेपत्ता झाल्यानंतर हा आरोपी स्वतः कुटुंबीयांसोबत शोधाशोध करत होता. म्हणजेच तो निर्दोष असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांच्या चौकशीत सत्य समोर आले आणि त्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी विद्यार्थ्याचा काही दिवसांपूर्वी त्या बालकाच्या पालकांशी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. याच रागातून त्याने हे क्रूर कृत्य केले आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पीडित कुटुंबाशी संवाद साधला. नरसेना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला घरातूनच अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप उसळला असून, गावकऱ्यांनी आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.