क्रूरतेचा कळस! डोक्यात १० वेळा लाटणे मारले; पत्नीच्या जाचाला कंटाळून पती झाला बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:20 IST2026-04-01T14:19:59+5:302026-04-01T14:20:35+5:30
उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने घर सोडले आहे. बेपत्ता होण्यापूर्वी त्याने पत्नीवर गंभीर आरोप करणारा व्हिडिओ शेअर केला.

AI Generated Image
"मला इज्जतीने जगता आले नाही आणि आता मरूही दिले जात नाहीये... तिला फक्त पैशांशी मतलब आहे," डोळ्यात पाणी आणि आवाजात प्रचंड वेदना घेऊन एका पतीने आपल्या पत्नीच्या छळाचा पाढा वाचला आणि तो घरातून बेपत्ता झाला. उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातून समोर आलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने रात्री डोक्यात १० वेळा लाटण्याने प्रहार केल्याचा गंभीर आरोप करत या तरुणाने स्वतःचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जखनिया गोविंद गावातील रहिवासी असलेला दिलीप कुमार पेशाने वकील आहे आणि त्याचे फोटोकॉपीचे दुकानही आहे. वर्षभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच सुखी संसाराला दृष्ट लागली. पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या छळामुळे दिलीप मानसिकदृष्ट्या खचला होता. सोमवारी सकाळी तो कामासाठी बाहेर पडला, पण रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. खानपूर परिसरातील सिधौना येथे त्याची दुचाकी आणि बॅग पोलिसांना बेवारस अवस्थेत सापडली आहे.
व्हिडिओतील 'तो' धक्कादायक खुलासा
बेपत्ता होण्यापूर्वी दिलीपचा एक व्हिडिओ समोर आला असून, तो पाहून कोणाचेही काळीज पिळवटून निघेल. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, "माझ्या पत्नीने माझे जगणे नरक केले आहे. ती सतत मला मरण्यासाठी प्रवृत्त करते. रात्री तिने माझ्या डोक्यात १० वेळा लाटण्याने मारले. मला साधे झोपूही दिले जात नाही. मी आजारी असतानाही तिने माझी साधी विचारपूस केली नाही. तिला माझ्याशी काहीही देणेघेणे नाही, तिला फक्त पैसा हवा आहे."
"मी सगळ्यांना सोडून जातोय..."
दिलीपने आपल्या व्हिडिओच्या शेवटी अत्यंत भावूक होत म्हटले की, "मी आता कायमचा निघून जातोय. ना इज्जतीने जगलो, ना शांतपणे मरू शकलो." या व्हिडिओमुळे दिलीपच्या कुटुंबात मोठी खळबळ उडाली असून त्याच्या आईने, गायत्री देवी यांनी आपल्या मुलाला शोधण्यासाठी पोलिसांकडे टाहो फोडला आहे.
पोलीस तपासात काय समोर आले?
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीपची दुचाकी आणि सामान सापडले असले तरी तो स्वतः अद्याप बेपत्ता आहे. पत्नी आणि सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. एका वकीलावर स्वतःच्याच घरात अशी वेळ आल्याने स्थानिक वकील संघटनेनेही या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लावण्याची मागणी केली आहे.