हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या तरुणाचा धक्कादायक शेवट; ब्लॅकमेल करणाऱ्या विवाहितेचे फोटो चिकटवले भिंतीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 16:07 IST2025-12-20T16:03:28+5:302025-12-20T16:07:42+5:30
उत्तर प्रदेशात हनिट्रॅपमध्ये अडकलेल्या इंजिनिअरने स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या तरुणाचा धक्कादायक शेवट; ब्लॅकमेल करणाऱ्या विवाहितेचे फोटो चिकटवले भिंतीवर
Engineer Honeytrap Case:उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरने विवाहित महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने जे पाऊल उचलले, त्याने संपूर्ण पोलीस प्रशासन आणि शहर हादरले आहे.
गोंडा येथील गायत्रीपुरम कॉलनीमध्ये राहणाऱ्या अभिषेक श्रीवास्तव या तरुणाचा मृतदेह त्याच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अभिषेकने केवळ आत्महत्या केली नाही, तर मरण्यापूर्वी आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींचा पर्दाफाश केला. त्याने आपल्या खोलीच्या भिंतीवर विवाहित महिला आणि तिच्या पतीसोबत झालेले व्हॉट्सॲप चॅट्स, व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट्स आणि कॉल डिटेल्स कागदावर प्रिंट करून चिकटवले होते.
अभिषेकने स्वतःचे हात बांधून आणि तोंडात कापडाचा बोळा कोंडून आत्महत्या केली, ज्यावरून तो किती प्रचंड मानसिक दबावाखाली होता, हे स्पष्ट होते. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक एका खासगी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. त्याच्या घरासमोर राहणाऱ्या सोनल सिंह नावाच्या महिलेने त्याला आपल्या जाळ्यात ओढले होते. या कटात सोनलचा पती अजित सिंह हा देखील सामील होता.
२८ सप्टेंबर रोजी सोनल आणि तिच्या पतीने अभिषेकवरच ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला होता, ज्यामुळे ३० सप्टेंबरला अभिषेकला तुरुंगात जावे लागले. १२ ऑक्टोबर रोजी तुरुंगातून सुटल्यानंतर, हे दाम्पत्य अभिषेकवर प्रकरण मिटवण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी करत होते. पैसे न दिल्यास पुन्हा खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी त्याला दिली जात होती. या तणावातून अभिषेकने स्वतःला संपवले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. खोलीचा दरवाजा आतून बंद होता, तो तोडून पोलीस आत शिरले. भिंतीवर चिकटवलेले डिजिटल पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी सांगितले की, "मृत अभिषेकचे काका उद्धव श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून आरोपी सोनल सिंह आणि तिचा पती अजित सिंह यांच्या विरोधात नगर कोतवालीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे."
परिसरात खळबळ
अभिषेकच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याने भिंतीवर चिकटवलेल्या पुराव्यांनी हनीट्रॅपचे हे रॅकेट उघड केले आहे. पोलीस आता या डिजिटल पुराव्यांच्या आधारे फरार आरोपी पती-पत्नीचा शोध घेत आहेत.