आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:40 IST2025-12-16T17:40:26+5:302025-12-16T17:40:49+5:30
मुलगा आणि मामाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली.

आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
UP Crime: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निवृत्त पोलिस अधिकारी रणवीर सिंह यादव यांनी आपल्या मुलीची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह इटावा येथे टाकल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला कुटुंबाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र चौकशीत संपूर्ण प्रकरण उघड झाले.
प्रेमविवाहाला विरोध, वादातून हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर यादव याची मुलगी नात्यातील भाच्याशी लग्न करू इच्छित होती. पण, हे कुटुंबाला मान्य नव्हते. समाजात बदनामी होईल, असे सांगून कुटुंबीयांनी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्यास तयार नव्हती. 24 ऑक्टोबर रोजी याच मुद्द्यावरुन घरात जोरदार वाद झाला. वाद वाढताना मुलीने रागाच्या भरात 'मला मारून टाका' असे शब्द उच्चारल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.
पत्नीने पाय धरले, वडिलांनी ओढणीने गळा आवळला
वाद वाढल्यानंतर आईने मुलीचे पाय धरले, तर रणवीर यादव याने ओढणीने मुलीचा गळा आवळला. या घटनेत कुटुंबातील इतर सदस्यांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. हत्येनंतर रणवीर यादव यांनी आपल्या मोठ्या मुलाला फोन करून 'आपले काम झाले' असे सांगितले. त्यानंतर मुलाने मृतदेह कारमधून मामाच्या घरी नेला आणि मामाच्या मदतीने यमुना नदीच्या काठावर मृतदेहाची विल्हेवाट लावली.
मृत्यूपूर्वी प्रियकराला 29 सेकंदांचा व्हिडिओ
कुटुंबाने ही घटना लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण प्रकरण फार काळ दडपून ठेवता आले नाही. हत्या होण्यापूर्वी तरुणीने आपल्या प्रियकराला 29 सेकंदांचा व्हिडिओ पाठवला होता. या व्हिडिओमध्ये तिने आपले नाव सांगून त्याच्यावर प्रेम असल्याचे, त्याच्याशीच लग्न करायचे असल्याचे आणि घरच्यांकडून जीवाला धोका असल्याचे सांगितले. तिने व्हिडिओत आपल्या वडील, आई, मोठा भाऊ, लहान बहीण, गावातील एक व्यक्ती, आत्या आणि मामाकडून धोका असल्याचेही सांगितले होते. तसेच, माझा आधी खून झाला, तर नंतर माझ्या प्रियकरालाही मारले जाईल, अशी भीती तिने व्यक्त केली.
यमुना काठी मृतदेहाचे अवशेष सापडले
रविवारी पोलिसांनी यमुना नदीच्या काठावरून तरुणीच्या मृतदेहाचे अवशेष जप्त केले. सोमवारी चौकशीनंतर आरोपी वडील रणवीर सिंह यादव, भाऊ गौरव आणि मामा सतिश यांना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात आला. मृत तरुणीची आई आणि मामी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सतत छापे टाकले जात आहेत.