भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 'गँगस्टर' बनली पत्नी; पतीने रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून घरातच संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:15 IST2025-10-14T15:15:21+5:302025-10-14T15:15:59+5:30
उत्तर प्रदेशात गँगस्टर पतीने गँगस्टर पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली.

भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 'गँगस्टर' बनली पत्नी; पतीने रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून घरातच संपवले
UP Crime: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये गँगस्टर पतीने गोळ्या घालून गँगस्टर पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. घटनेच्या वेळी मुलं घरातचं होती. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी घरातून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या घरगुती वादातून झाल्याचे म्हटलं जात आहे.
मंगळवारी गाझियाबादच्या राजनगर एक्सटेंशनमधील एका पॉश सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. गँगस्टर पतीने पत्नीची त्यांच्या घरात मुलीसमोरच गोळ्या घालून हत्या केली आणि नंतर पळ काढला. घटनेच्या वेळी दुसरी मुलगी शाळेत होती. आरोपी पती विकास आणि पत्नी रूबी हे त्यांच्या दोन मुलींसह अजनारा इंटिग्रिटी सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये राहत होते. मोदीनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गँगस्टर कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. विकास काही काम करत नव्हता त्यामुळे अनेकदा दोघांमध्ये भांडणे होत असत. तो दोन दोन महिने गायब असायचा. मंगळवारी सकाळी विकासने त्याचा पासपोर्ट मागितला आणि दोघांमध्ये त्याच मुद्द्यावरून वाद झाला. कडाक्याच्या भांडणानंतर, संतप्त झालेल्या विकासने रुबीवर रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली.
विकास आणि रूबी हे दोघेही गेल्या एक वर्षापासून या फ्लॅटमध्ये राहत होते, पण त्यांनी त्यांच्या कुटुंबाशी किंवा शेजाऱ्यांशी संवाद साधला नाही. शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की पती-पत्नीही एकमेकांशी संवाद साधत नव्हते. घटनेची माहिती मिळताच, रूबीची आई (मुलींची आजी) मोदीनगरहून घटनास्थळी आली आणि मुलींना सोबत घेऊन गेली. विकासने वापरलेले रिव्हॉल्व्हर परवाना असलेले होते की बेकायदेशीर होते याचा तपास सुरू आहे. रुबीचे शवविच्छेदन केले जात आहे.
भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बनली गँगस्टर
मिळालेल्या माहितीनुसार, रुबी मुरादनगर येथील गँगस्टर होती. तिच्याविरोधात तीन गुन्हे दाखल होते. २०२० मध्ये कट रचल्याचा आणि हत्येचा आरोप होता. पोलिसांनी तिला पकडून तुरुंगात पाठवलं होतं. त्याच वर्षी रुबीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला. त्यानंतर २०२३ मध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. २०१९ मध्ये दारुच्या प्रकरणावरुन रुबीचा भाऊ दीपेंद्र याची हत्या करण्यात आली होती. दीपेंद्रच्या हत्येचा आरोप अक्षय सांगवान याच्यावर होता. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रुबीने कट रचण्यास सुरुवात केली होती. तिने तिची जमीन विकून शूटर गोळा केले आणि विकास, सप्पू आणि अक्षयचा मित्र अश्वनीला सोबत घेतले. २४ ऑगस्ट २०२० रोजी मोदीनगरच्या तिबडा रोडवर अक्षय सांगवानची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.