चौघे घरात घुसले अन् गळा चिरला; नववधूची निर्घृण हत्या! ग्रामस्थांचा आक्रोश, 7 वर्षीय मुलाने पाहिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:40 IST2025-10-09T12:40:23+5:302025-10-09T12:40:53+5:30
या घटनेनंतर एसपींसह वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.

चौघे घरात घुसले अन् गळा चिरला; नववधूची निर्घृण हत्या! ग्रामस्थांचा आक्रोश, 7 वर्षीय मुलाने पाहिले
UP Crime:उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. चार अज्ञात दुचाकीस्वार एका घरात घुसले आणि महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरुन निर्दयपणे हत्या केली. हत्येनंतर आरोपी तिथून पसार झाले. घटनेची माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली. महिलेसोबत झालेल्या या हत्येनंतर कुटुंबीयांमध्ये आक्रोश आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. आवाज ऐकून शेजारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले.
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश सिंह, उप-अधीक्षक सिराथू तिवारी, सैनी कोतवालीचे प्रभारी आणि सिराथू चौकी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला असून, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, सैनी कोतवाली क्षेत्रातील सिराथू परिसरात राहणारी 23 वर्षीय अंजली देवी घरात एकटी होती. अंजलीचा विवाह याच वर्षी मे महिन्यात झाला होता. तिचा पती दिलीप पटेल दिल्लीमध्ये खाजगी नोकरी करतो. बुधवारी तिचे सासरे मोहन पटेल आणि सासू शेतात काम करत होते, त्या वेळी चार जण दुचाकीवरुन आले आणि घरात घुसून धारदार शस्त्राने अंजलीच्या गळ्यावर अनेक वार केले, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
घराबाहेर खेळत असलेला सात वर्षीय भाच्चा आर्यन घरात आला, तेव्हा त्याने अंजलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले आणि किंचाळला. त्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक धावत आले आणि पोलिसांना माहिती दिली. सूचना मिळताच पोलिस फोर्सने घटनास्थळी धाव घेतली. अॅडिशनल एसपी राजेश सिंह यांनी सांगितले की, “सैनी कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचलो. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला जाईल. पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू आहे.”