धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:22 IST2025-12-11T13:19:12+5:302025-12-11T13:22:43+5:30
क्लिनिक चालवणाऱ्या काका-पुतण्याच्या जोडीने एका महिलेवर जीवघेणा प्रयोग केला. किडनी स्टोननी त्रस्त असलेल्या या महिलेचं ऑपरेशन करण्यासाठी या बोगस डॉक्टरने मोबाईलमध्ये 'YouTube' वर व्हिडीओ पाहिला.

AI फोटो
उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्लिनिक चालवणाऱ्या काका-पुतण्याच्या जोडीने एका महिलेवर जीवघेणा प्रयोग केला. किडनी स्टोननी त्रस्त असलेल्या या महिलेचं ऑपरेशन करण्यासाठी या बोगस डॉक्टरने मोबाईलमध्ये 'YouTube' वर व्हिडीओ पाहिला आणि त्याच पद्धतीने सर्जरी सुरू केली. मात्र चुकीच्या नस कापल्या गेल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी क्लिनिक सील केले असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना बाराबंकी जिल्ह्यातील कोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दफरापूर माजरा सैदानपूर गावात घडली. तेह बहादूर रावत यांच्या पत्नी मुनीश्र रावत गेल्या काही दिवसांपासून वेदनेने त्रस्त होत्या. ५ डिसेंबर रोजी कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी 'श्री दामोदर औषधालय'मध्ये नेलं. तेथे असलेल्या क्लिनिक चालक ज्ञान प्रकाश मिश्राने तपासणीनंतर सांगितलं की,किडनी स्टोन आहे आणि तातडीने ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनसाठी २५,००० रुपये निश्चित करण्यात आले होते आणि महिलेच्या पतीने २०,००० रुपये जमाही केले होते.
दारूच्या नशेत होता डॉक्टर
महिलेच्या पतीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत जे सांगितलं ते धक्कादायक आहे. ऑपरेशन टेबलवर महिलेला नेलं असता, डॉक्टर ज्ञान प्रकाश मिश्रा दारूच्या नशेत होता. त्याला मेडिकल सायन्सचं कोणतंही ज्ञान नाही, त्याने मोबाईलमध्ये YouTube ओपन केलं आणि 'स्टोनचं ऑपरेशन कसं करावं' चा व्हिडिओ पाहून महिलेचं ऑपरेशन करायला सुरुवात केली. अपुऱ्या ज्ञानामुळे आणि नशेत असल्याने त्याने महिलेच्या महत्त्वाच्या नसा कापल्या. खूप रक्तस्राव आणि चुकीच्या उपचारामुळे दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू झाला.
लोकांच्या जीवाशी खेळ
तपासात असं समोर आलं आहे की, मुख्य आरोपी ज्ञान प्रकाश मिश्राचा पुतण्या विवेक कुमार मिश्रा हा रायबरेली येथील एका आयुर्वेदिक रुग्णालयात सरकारी कर्मचारी आहे. त्याच्या नावाचा वापर करून ही काका-पुतण्याची जोडी अनेक वर्षांपासून हे क्लिनिक चालवत होती आणि लोकांच्या जीवाशी खेळत होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य विभाग तात्काळ सक्रिय झाले आणि क्लिनिक सील केले आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार आहेत.