पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 00:18 IST2025-07-17T00:16:14+5:302025-07-17T00:18:59+5:30

दोन वर्षांपासून कामधंदाच करत नव्हता आरोपी

Unemployed Nagpur youth turns to gold chain snatcher to pay alimony to wife | पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल

पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: एरवी पत्नी किंवा प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी काही तरुण चोर बनल्याच्या घटना दिसून आल्या आहेत. मात्र, नागपुरात चक्क घटस्फोटित पत्नीला पोटगी देण्यासाठी एक बेरोजगार चेनस्नॅचर बनल्याची बाब समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केल्यावर हा प्रकार कळाला.

कन्हैय्या नारायण बौराशी (४२, गणपतीनगर, गोधनी मार्ग, मानकापूर) असे आरोपीचे नाव आहे. दोन वर्षांपासून तो कुठलाच कामधंदा करत नव्हता व पत्नीदेखील त्याला सोडून चालली गेली. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका चेनस्नॅचिंगच्या घटनेच्या तपासात कन्हैय्याचा भंडाफोड झाला. २२ फेब्रुुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जयश्री जयकुमार गाडे (७४, संताजी सोसायटी, न्यू बालपांडे ले आऊट, मनीषनगर) यांच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपीने ओढून पळ काढला होता. बेलतरोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता व गुन्हे शाखेच्या पथकाकडूनदेखील समांतर तपास सुरू होता.

तांत्रिक तपास तसेच खबऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी कन्हैय्याला ताब्यात घेतले. त्याने चेनस्नॅचिंग केल्याची कबुली दिली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने अजनी व बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन जबरी चोरी केल्याची माहिती दिली. मागील दोन वर्षांपासून तो कोणताही कामधंदा करीत नव्हता. घरखर्च भागविण्यासाठी तसेच पत्नीला पोटगी देण्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने चेनस्नॅचिंग सुरू केली. सहायक पोलिस निरीक्षक मंगला हरडे, मनीष बुरडे, संतोष गुप्ता, प्रफुल्ल मानकर, संदीप भोकरे, कुणाल लांगडे, संदीप पडोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सराफा व्यापाऱ्याविरोधात देखील गुन्हा

कन्हैय्याने काही सोन्याच्या चेन गोधनी मार्ग येथील श्री साई ज्वेलर्सचा मालक अमरदीप कृष्णराव नखाते (४२, मातानगर) याला विकल्या. पोलिसांनी त्याच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कन्हैय्याच्या ताब्यातून मोटारसायकल, फोन तर नखातेकडून १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा रवा असा १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.

Web Title: Unemployed Nagpur youth turns to gold chain snatcher to pay alimony to wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.