धक्कादायक! दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणून शिक्षकानं विद्यार्थ्याला बेंचवर आपटून दात पाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 15:51 IST2022-08-19T15:50:32+5:302022-08-19T15:51:37+5:30
जालौर येथील घटना ताजी असतानाच राजस्थानच्या उदयपूर येथेही एका शिक्षकानं विद्यार्थ्याला जबर शिक्षा केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.

धक्कादायक! दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणून शिक्षकानं विद्यार्थ्याला बेंचवर आपटून दात पाडले
उदयपूर-
जालौर येथील घटना ताजी असतानाच राजस्थानच्या उदयपूर येथेही एका शिक्षकानं विद्यार्थ्याला जबर शिक्षा केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. उदयपूरमधील एका खासगी शाळेतील शिक्षकानं १४ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्याचे दात पाडले आहेत. विद्यार्थ्याची चूक काय तर त्यानं दुसऱ्या एका विद्यार्थ्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. या धक्कादायक प्रकरानंतर संताप व्यक्त केला जात आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उदयपूर शहरातील हिरणमगरी ठाणे हद्दीतील एका खासगी शाळेत दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणून एका शिक्षकानं विद्यार्थ्याला बेंचवर आपटलं. शिक्षकानं विद्यार्थ्याचं डोकं धरलं आणि त्याला बेंचवर आदळलं. यात विद्यार्थ्याचे दात पडले. विद्यार्थ्यानं हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर शिक्षकाविरोधात पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ओमप्रकाश नंदावत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलरा सम्यक नंदावत एका खासगी शाळेत शिकतो. गुरुवारी शाळेच्या शेवटच्या तासात हिंदी विषयाचे शिक्षक कमलेश वैष्णव यांनी एका दुसऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला होता. पण त्याला ते उत्तर येत नसल्यामुळे सम्यकनं उत्तर दिलं. त्यावर शिक्षक कमलेश वैष्णव नाराज झाले आणि त्यांनी सम्यकला शिक्षा म्हणून मारलं.
कमलेश यांनी सम्यकचं डोकं पकडून त्याला बेंचवर आदळलं. यामुळे त्याचे दोन दात पडले असा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेनंतर शाळेनं सम्यकला दवाखान्यात नेऊन उपचार केले आणि घरी सोडलं. जेव्हा विद्यार्थ्यानं घरी गेल्यानंतर कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठलं.