ऑनलाईन डेटींग ऍपच्या आधारे पुरुषांना लुबाडणाऱ्या दोन सराईत तरुणींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:43 IST2025-11-28T17:43:33+5:302025-11-28T17:43:55+5:30
-मंगेश कराळे लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : ऑनलाईन डेटींग ऍपच्या आधारे पुरुषांशी संपर्क साधून भेटीच्या बहाण्याने एकत्र येऊन गुंगीकारक औषध ...

ऑनलाईन डेटींग ऍपच्या आधारे पुरुषांना लुबाडणाऱ्या दोन सराईत तरुणींना अटक
-मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा : ऑनलाईन डेटींग ऍपच्या आधारे पुरुषांशी संपर्क साधून भेटीच्या बहाण्याने एकत्र येऊन गुंगीकारक औषध देवून मौल्यवान दागिने लुबाडणाऱ्या दोन सराईत तरुणींना मांडवी पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपी तरुणींकडून दोन गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी शुक्रवारी दिली आहे.
३१ वर्षीय पुरुष हॅपन डेटींग ऍपच्या आधारे एका तरुणीसोबत ऑनलाईन ओळख झाल्यानंतर ते दोघे मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजवर २२ नोव्हेंबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भेटले. त्यावेळी दुसरी एक तिच्यासोबत लॉजवर आली. रूम भाड्याने घेऊन तिघे दारू पिले. पीडित पुरुषाला अचानक खुप झोप लागल्याने ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता जाग आल्यावर गळ्यातील दोन तोळे सोन्याची चेन, मोबाईल आणि स्मार्ट घड्याळ असा १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल दोन्ही तरुणी चोरी करून पळाल्या होत्या. मांडवी पोलिसांनी तक्रार आल्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे या दोन्ही आरोपी तरुणींनी २३ नोव्हेंबरला रात्री परत दुसऱ्या पुरुषाला जाळयात अडकवुन त्याला देखील लॉजवर भेटून त्याचेसोबत ड्रिंक करुन त्याची सोन्याची चेन, मोबाईल चोरुन पळून गेल्या होत्या. त्याबाबत काशिमिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा केल्यावर आरोपी तरुणी स्वतःची ओळख निष्पन्न होऊ नये म्हणून डेटिंग ऍपवरील त्यांची सर्व प्रोफाईल डिलिट केली. तसेच लॉजमध्ये अस्पष्ट आयडी कार्ड व चुकीचे मोबाईल क्रमांक दिले. कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन ट्रांजेक्शन न करता पसार झाल्या. कसलाही दुवा नसताना मांडवी पोलिसांनी कसून तपास सुरू केला. लॉजवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयीत तरुणींचे अंधुक फोटो प्राप्त करुन अनेक ठिकाणांचे सीसीटीव्ही प्राप्त करुन तसेच तांत्रीक विश्लेषशनाद्वारे मालाड परिसरातून दोन्ही आरोपी तरुणींना मांडवी गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेतले. आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यांची उकल करून सोन्याचे दागिने, मोबाईल व इतर वस्तू असा एकूण ४ लाख १३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बरेचशे पुरुष पिडीत व्यक्ती हे बदनामीच्या भितीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात नसल्याचे या तरुणींच्या लक्षात आल्याने ते गुन्हा पूर्ण नियोजनबध्द करुन पसार होत असल्याचे तपासामध्ये आढळुन आले आहे. ज्या पिडीत व्यक्तींची अशाप्रकारे फसवणुक झालेली असल्यास त्यांनी पोलीसांशी संपर्क साधावा असे पोलीस आयुक्तालयाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे.