शिवनेरीतील प्रवाशांची बॅग चोरणारे दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 12:13 PM2019-11-20T12:13:56+5:302019-11-20T12:15:11+5:30

शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन एसटी बस स्थानकांतून प्रवाशांच्या किंमती ऐवज असलेल्या बॅग चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती़...

two person arrested who stolen in the Shivneri passenger bag | शिवनेरीतील प्रवाशांची बॅग चोरणारे दोघे अटकेत

शिवनेरीतील प्रवाशांची बॅग चोरणारे दोघे अटकेत

Next
ठळक मुद्देआरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर ठाणे, मनमाड, करमाळा येथे यापूर्वी गुन्हे दाखल

पुणे : शहरातील एसटी बस स्थानकातून शिवनेरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची लॅपटॉपसह बॅग चोरणाऱ्या सराइताला त्याच्या साथीदारासह स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे़. 
दिलीप दशरळ डिकोळे (वय ३०, रा़ घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि समाधान भारत भोसले (वय ३१, रा़ नेरले, करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपयांचे विविध कंपन्यांचे १९ लॅपटॉप जप्त केले आहेत़. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर ठाणे, मनमाड, करमाळा येथे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत़. 
काही दिवसांपासून शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन एसटी बस स्थानकांतून प्रवाशांच्या किंमती ऐवज असलेल्या बॅग चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती़. त्यामुळे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्याचे पथक बस स्थानकावर तैनात केले होते़. बस स्थानकातील सीसीटीव्हीची पाहणी करत असताना पोलिसांना काही जण संशयास्पद आढळून आले़. त्यांची माहिती घेतली असताना चोरी करणारा दिलीप डिकोळे याच्यासारखा दिसत असल्याचे आढळून आले़. त्यामुळे पोलिसांनी तातडीने दोन पथके करमाळा येथे पाठविली़. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी डिकोळे याला ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली़. तसेच, चोरी केलेले लॅपटॉप तो विक्रीसाठी समाधान भोसले याच्याकडे देत असल्याचे सांगितले़. त्यावरून पोलिसांनी भोसले याला अटक केली़. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त सर्जेराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक  शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक  सुरेश जायभाय, संजय आदलिंग, पोलीस कर्मचारी सज्जाद शेख, दशरथ गभाले, सचिन कदम, विजय कुंभार, सोमनाथ कांबळे, सचिन दळवी, संदीप साळवे, ज्ञानेश्वर बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांच्या पथकाने केली.
............
अशी करीत असे चोरी
दिलीप हा आत्तापर्यंत पोलिसांच्या जाळ्यात सापडत नव्हता. चोरी करण्यासाठी तो शिवनेरी बसची निवड करी. ज्या प्रवाशांकडे लॅपटॉपची बॅग आहे, असे सावज तो हेरत होता. 
लॅपटॉप असलेल्या प्रवाशाच्या सीटजवळ उभे राहून तो स्वत:कडील बॅग लॅपटॉप असलेल्या बॅगजवळ ठेवत असे़. गाडी सुटण्याच्या वेळी लॅपटॉप असलेली बॅग घेऊन स्वत:ची बॅग तेथेच ठेवून तो गाडीतून खाली उतरत असे़. 
....
दिलीप डिकोळे हा सोलापूर, नांदेड, औरंगाबाद, नाशिक या परिसरातही चोऱ्या करीत असे़. पुणे शहरातील ५ गुन्हे उघडकीस आले असून जप्त केलेले आणखी १४ लॅपटॉप कोणाचे आहेत, याची माहिती पोलीस घेत आहेत़. शिवनेरीतून प्रवास करताना ज्यांच्या लॅपटॉपची बॅग चोरीला गेली, त्यांनी स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी यांनी केले आहे़. 

Web Title: two person arrested who stolen in the Shivneri passenger bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.