वाकड परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 15:25 IST2018-10-04T15:18:29+5:302018-10-04T15:25:29+5:30
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनांची मालिका संपेना : बुधवारी रात्री गुन्हा दाखल

वाकड परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पिंपरी चिंचवड : गुन्हेगारी रोखण्याच्या हेतूने पिंपरी चिंचवड येथे नवीन पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी पिंपरी परिसर हादरला आहे. यातच वाकडला अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नराधम पित्यासह अन्य चौघावर वाकड ठाण्यात बुधवारी रात्री पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोईसर मुंबई येथील श्रमसफल्य बाल संस्थेच्या समाजसेविका जयश्री राजू श्रीनिवासन यांनी मुंबईत फिर्याद दाखल केली असून हा गुन्हा शून्य क्रमांकाने वाकड ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.एका घटनेत जन्मदात्या पित्यासह अन्य चौघांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी १२ वर्षीय बालिकेवर वारंवार बलात्कार करुन शारीरिक मानसिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत वाकड ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश स्वामी यांनी दिलेली माहिती अशी की २०१६ मध्ये पीडित मुलीच्या पित्याने सर्व प्रथम लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर हैद्राबादमध्ये राहत्या घरी इतर दोघांनी मिळून तिचे हातपाय बांधले व मुरचीची धुरी देत पाईपने मारहाण केली. यानंतर एकाने हैद्राबाद येथील रेल्वेत तर दुसऱ्या एकाने सोलापूर रेल्वे स्टेशनवर तिच्यावर अत्याचार केले.