Two flat thieves broke into the same building in goa | एकाच इमारतमधील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले
एकाच इमारतमधील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले

वास्को: दक्षिण गोव्यातील चिखली येथे असलेल्या ग्रीन व्हेली भागातील ‘जास्मीन एनक्लेव’ इमारतीतील दोन फ्लॅट दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी फोडून एका फ्लॅटमधील सोन्याचे ऐवज व रोख रक्कम मिळून दोन लाख रुपयांची मालमत्ता लंपास केली. दोन्ही फ्लॅटमध्ये सकाळी १०.३० ते दुपारी २ च्या दरम्यान चोरी घडल्याचे पोलीसांना तपासात जाणविले असून या काळात सदर इमारतीतील बहुतेक लोक कामावर असत असल्याची जाणीव त्या चोरट्यांना असावी असा संशय पोलीस सध्या व्यक्त करीत आहेत.

वास्को पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी सकाळी १०.३० ते २ च्या दरम्यान सदर चोरी घडली. चिखली, दाबोळी येथील ग्रीन व्हेली भागातील ‘जास्मिन एनक्लेव’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारा भिमराम बसप्पा याच्या कुटूंबातील सदस्य घरी परतला असता त्यांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप अज्ञातांनी फोडलेले असल्याचे पाहीले. अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश करून आत असलेल्या कपाटातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच दिड लाख रुपयांचे सोन्याचे एवज लंपास केल्याचे समजताच त्यांनी त्वरित या घटनेबाबत वास्को पोलीसांना माहीती दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार ह्याच इमारतीच्या दुसºया मजल्यावर असलेल्या अन्य एका फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी फोडून घरात चोरीसाठी प्रवेश केला होता, मात्र येथे त्यांना काहीच सापडले नाही. पोलीसांना माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन ह्या चोरी प्रकरणाचा पंचनामा केला. ग्रीन व्हेली भागातील इमारतीच्या फ्लॅटमध्ये झालेल्या ह्या चोरी प्रकरणातील चोरट्यांना गजाआड करण्यास बुधवारी उशिरा रात्री पर्यंत पोलीसांना अपयश आले होते. भिमराव याच्या घरातील मालमत्ता लंपास करण्यासाठी आलेले ते अज्ञात चोरटे केवढे होते याबाबत जरी पोलीसांना ठोस माहीती मिळालेली नसली तरी याप्रकरणात दोन चोरट्यांचा हात असण्याची माहीती पोलीसांना तपासणी वेळी प्राप्त झाली आहे. तसेच हे चोरटे एकाच दुचाकीवरून आले होते अशी माहीती पोलीसांना तपास करत असताना मिळालेली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

‘जास्मीन एनक्लेव’ इमारतीतील फ्लॅटमध्ये झालेल्या चोरी प्रकरणातील चोरट्यांना गजाआड करण्यासाठी पोलीस सर्व मार्गाने तपास करत असून ह्या भागात असलेल्या ‘सीसीटीव्ही कॅमेरा’ ची फुटेजसुद्धा त्यांच्याकडून सध्या तपासण्यात येत असल्याची माहीती सूत्रांनी दिली. ‘जास्मीन एनक्लेव’ इमारतीतील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले असले तरी एकाच (भिमराव बसप्पा) फ्लॅटमधील मालमत्ता लंपास केल्याने व दुसºया फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी पोलीस तक्रार दिली नसल्याने पोलीसांनी येथील एकाच चोरी प्रकरणात अज्ञातांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला असल्याचे सूत्रांनी कळविले. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.

Web Title: Two flat thieves broke into the same building in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.