कारवार येथे भीषण अपघातात ओर्लीच्या दाम्पत्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 20:09 IST2020-01-27T20:07:09+5:302020-01-27T20:09:12+5:30
कारला लॉरीची धडक: दोन मुली गंभीर, गॉमेकोत दाखल

कारवार येथे भीषण अपघातात ओर्लीच्या दाम्पत्याचा मृत्यू
मडगाव - चेंडीया कारवार येथे सोमवारी दुपारी कार व लॉरी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ओर्ली (सासष्टी) गोवा येथील विष्णू नाईक (४७) व त्यांची पत्नी विद्या नाईक (४२) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या दोन मुली जखमी झाल्याने गंभीर अवस्थेत त्यांना बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, गोव्यातील हे कुटुंब कुमठ्याहून गोव्याच्या दिशेने यायला निघालेले असताना कारवारपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चेंडीया येथे दुपारी तीनच्या सुमारास अंकोलाच्या दिशेने जाणाऱ्या लॉरीने नाईक चालवत असलेली अल्टो कारला समोरासमोर धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की समोर बसलेले नाईक दाम्पत्याचा जागच्या जागी मृत्यू झाला. तर मागे बसलेल्या त्यांच्या दोन मुली वैष्णवी (१६) व सान्वी (९) या गंभीर जखमी झाल्या. त्याना तातडीने गॉमेकोत आणण्यात आले.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, नाईक हे दक्षिण गोव्यातील एका तारांकित हॉठेलात कामाला होते. आपल्या कुटुंबाला घेऊन ते कुमठ्याला गेले होते. परत गोव्यात येताना हा अपघात घडला. कारमध्ये अडकलेले मृतदेह गाडीचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.