क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक; आरोपीत राष्ट्रवादी नगरसेवकांचा मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 20:14 IST2021-10-05T20:12:48+5:302021-10-05T20:14:09+5:30
Crime News : शहर गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक; आरोपीत राष्ट्रवादी नगरसेवकांचा मुलगा
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-२ आसाराम बापू आश्रमा शेजारील एका बरेक खोलीत आयपीएलमधील दिल्ली व चेन्नई क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या दोघाना शहर गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करीत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ आसाराम बापू आश्रम शेजारील एका बरेकच्या खोलीत इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट मॅचमधील (आयपीएल) चेन्नई विरुद्ध दिल्ली क्रिकेटवर सट्टा खेळत असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख महेश तरडे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री लाईव्ह क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्यावर धाड टाकून विशाल प्रकाश सावलाणी व गिरीश सतरामदास जेसवानी यांना रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह अटक केली. यातील जेसवानी हा राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांचा मुलगा असल्याने, एकच खळबळ उडाली. गेल्या आठवड्यात क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या तिघाना अटक करून रोख रक्कमेसह १८ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला होता.
शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात सावलानी व जेसवानी हे रवी शेट्टी व राम यांच्यासह इतरां सोबत मोबाईलवर क्रिकेट सट्टा खेळत असल्याचे उघड झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी महेश तरडे यांनी इतरांचा शोध सुरू असल्याचे सांगून कारवाईचे संकेत दिले. गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करीत आहेत.