चिंचवड येथे घरफोडीप्रकरणी मित्रासह दोन भावांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 18:52 IST2019-08-01T18:50:54+5:302019-08-01T18:52:41+5:30
चोरीला गेलेल्या ४७ तोळे सोन्याचे दागिने व ४६० रुपयांची नाणी असा १३ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

चिंचवड येथे घरफोडीप्रकरणी मित्रासह दोन भावांना अटक
पिंपरी : घरफोडी करून दागिन्यांसह रोकड लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना १२ तासांत जेरबंद करण्यात आले. चोरीला गेलेल्या ४७ तोळे सोन्याचे दागिने व ४६० रुपयांची नाणी असा १३ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. एका मित्रासह दोन भावांना अटक केली आहे. चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने (वय २६, रा. चिंचवड), बिल्डर उर्फ शशिकांत अनंत माने (वय २२, रा. हडपसर, पुणे) व कम्या उर्फ कमलेश दिलीप कसबे (वय २२, रा. पत्राशेड,लिंकरोड,चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. चंद्या माने हा चिंचवड पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हेगार व तडीपार आहे. चंद्या व बिल्डर उर्फ शशिकांत दोन्ही भाऊ आहेत. कम्या त्यांचा मित्र आहे.
चंद्या माने वाल्हेकरवाडीतील पेट्रोल पंपाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, बिल्डर व कम्या यांच्यासोबत चिंचवड येथे घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी केल्याचे त्याने सांगितले. तसेच चिंचवड लिंकरोड येथील पत्राशेडमधील दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील रोकड लंपास केल्याचेही त्याने कबूल केले. त्यानंतर पोलिसानी बिल्डर व कम्या या दोघांना लिंकरोडवरील पत्राशेड समोरील मोकळ्या इमारतीतून ताब्यात घेतले. चौकशी करून त्यांच्याकडून ४७ तोळे सोन्याचे दागिने व ४६० रुपयांची नाणी असा १३ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यामुळे चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल केलेले घरफोडीचे दोन गुन्हे १२ तासांत उघड करून चोरी गेलेला मुद्देमाल १०० टक्के हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. चंद्या, बिल्डर व कम्या या तिघांना पोलिसांनी अटक केले. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड व पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतही चोरी, घरफोडी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस उप निरीक्षक सोमनाथ झेंडे, दत्तात्रय गायकवाड, पांडुरंग जगताप, सुधाकर अवताडे, स्वप्नील शेलार, ऋषिकेश पाटील, नितीन राठोड, गोविंद डोके, अमोल माने, सचिन वर्णेकर, पंकज भदाणे यांच्या पथकाने कारवाई केली.