जंगलात करंट लावून शिकार करण्याच्या प्रयत्नातील दोन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 20:05 IST2021-07-09T20:04:07+5:302021-07-09T20:05:14+5:30
वन विभागानं शोध घेत केली कारवाई. शिकारीसाठी विद्युत तार पसवल्याची आरोपींची कबुली.

जंगलात करंट लावून शिकार करण्याच्या प्रयत्नातील दोन आरोपींना अटक
चामोर्शी : चामोर्शा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या भाडभिडी उपक्षेत्रातील मारोडालगतच्या राखीव वनात विद्युत तारात पसरवून करंटने जंगली प्राण्यांची शिकार करण्याचा प्रयत्न वनविभागाच्या पथकाने हाणून पाडला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांच्या मार्गदर्शनाखाली भाडभिडी उपक्षेत्रातील कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी जंगल परिसरात लोखंडी बारीक तार पसरवून त्यात जिवंत विद्युत प्रवाह सोडलेला आढळला. या प्रकार श्वापदांच्या शिकारीसाठी असल्याचे लक्षात येताच परिसरात शोध घेण्यात आला. त्यात बरून अतुल मंडल (रा.नेताजीनगर) आणि तपन सतीश बिश्वास (रा.गौरीपूर) या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी ते तार पसरवली असल्याची कबुली दिली. घटनास्थळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत बारीक तार पसरवून ठेवण्यात आली होती.
कोरोनाच्या कारणामुळे न्यायालयीन कोठडी
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र त्यांची वनकोठडी घेणे अपेक्षित होते. पण कोरोनाकाळामुळे त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांनी सांगितले.