9 किलो सोनं घेऊन पळण्याचा प्रयत्न; ‘वंटास’च्या निर्मात्याला पोलिसांनी केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 14:08 IST2018-08-02T14:07:17+5:302018-08-02T14:08:14+5:30
पोलिसांनी सापळा रचून मानखुर्द टी जंक्शन येथून केली आरोपी अमोलला अटक

9 किलो सोनं घेऊन पळण्याचा प्रयत्न; ‘वंटास’च्या निर्मात्याला पोलिसांनी केले जेरबंद
मुंबई - 'वंटास' या मराठी चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अमोल लवटेला या चित्रपटामुळे खूप मोठे नुकसान झाले होते. ते नुकसान भरून काढण्यासाठी अमोल लवाटेने नऊ किलो सोनं लंपास करण्याचा कट आखला होता. मात्र मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी सापळा रचून मानखुर्द टी जंक्शन येथून अटक केली आणि त्याचा हा कट उधळून लावला आहे. एका व्यापाराचे सुमारे नऊ किलो सोने घेऊन अमोल पसार झाला होता. दहा दिवसांच्या शोधमोहीमेनंतर तो आणि त्यांचे साथीदार पोलिसांच्या सापळ्यात अडकले आहेत. या लंपास केलेल्या सोन्याची किंमत अंदाजे २ ते अडीज कोटी आहे.
काळबादेवी परिसरात अमोल लवटे हा पार्टनरशीपमध्ये सोने गाळण्याचा व्यवसाय करतो. झवेरी बाजारातील एका व्यापाऱ्याने २१ जुलै रोजी त्याला नऊ किलो सोने गाळण्यासाठी दिले. व्यापाऱ्याने त्याच्या नोकराला सोने घेऊन पाठवले होते. दरम्यान, नोकराला झोप लागली. याच संधीचा फायदा घेत अमोल त्याचा भाऊ संदीप लवटे, आप्पा घेरडे, पोपट आटपाडकर हे चौघे सोने घेऊन पसार झाले. त्यांनी जाताना गाळ्याची कडी बाहेरून लावून घेतली. जाग आल्यावर नोकराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा उघडला. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल आणि त्याचे साथीदार मानखुर्द टी जंक्शनजवळ येत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.