पोलिसाच्या पर्सवरच मारला डल्ला; प्रसंगावधान राखून रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 21:20 IST2019-07-20T21:19:59+5:302019-07-20T21:20:38+5:30
महिला पोलिस या दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास मनपा लोहगाव बसने प्रवास करत होत्या..

पोलिसाच्या पर्सवरच मारला डल्ला; प्रसंगावधान राखून रंगेहाथ पकडले
विमाननगर- पीएमपीएल बसमध्ये महिलांची पर्स लांबवणार्या तीन महिलांना महिला पोलिसाने प्रसंगावधान राखून पकडले. याप्रकरणी पूजा धर्मां गाज (वय २०), श्वेता राजेश गाज (वय २०) व सपना उर्फ डेविड गाज(वय २५,तिघीही.रा.सर्वोदय कॉलनी मुंढवा) यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तिघींनी चक्क महिला पोलिसाचीच पर्स लांबवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस नाईक नलिनी सावंत यांनी त्यांना प्रसंगावधान राखून रंगेहाथ पकडले.
पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवार( दि.१८ जुलै) रोजी महिला पोलिस नाईक नलिनी सावंत या दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास मनपा लोहगाव बसने प्रवास करत होत्या. बसमधील तीन महिला कडेवर लहान मुले घेऊन उभ्या होत्या.कडेवरील मुलाला इकडे तिकडे करत त्यांनी नाईक यांच्या पर्समध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दुसऱ्या एक महिलेच्या पर्समधील वस्तू काढल्याचे लक्षात आले. काही क्षणातच त्या बसमधून उतरण्याची घाई करू लागल्या. पोलिस नाईक नलिनी सावंत यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून बसच्या दारात या तिनही महिलांना अडवून बस विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे घेऊन आल्या. अधिक तपासात या तिनही महिलांनी पोलिस नाईक सावंत यांच्या पर्समधील रोख दोन हजार रुपये व सुनिता वाघमारे यांच्या पर्समधील रोख रक्कम व चांदिचे पैंजण असा तेरा हजार किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याचे कबूल केले.
चौकट -
पोलिस नाईक नलिनी सावंत या सध्या पोलिस मुख्यालय येथे काम करत असून त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने पीएमपीएल बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या तीन महिलांना रंगेहाथ पकडता आले. या उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी पोलिस नाईक नलिनी सावंत यांचे कौतुक व अभिनंदन केले. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव करीत आहेत.