"मंत्र्यांनी माझ्या पतीला खूप टॉर्चर केलं", आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 17:33 IST2026-03-22T17:32:45+5:302026-03-22T17:33:15+5:30
पंजाबच्या अमृतसरमध्ये आत्महत्या करणारे अधिकारी गगनदीप सिंग रंधावा यांच्या पत्नी उपिंदर कौर यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत.

"मंत्र्यांनी माझ्या पतीला खूप टॉर्चर केलं", आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीचे गंभीर आरोप
पंजाबच्या अमृतसरमध्ये आत्महत्या करणारे अधिकारी गगनदीप सिंग रंधावा यांच्या पत्नी उपिंदर कौर यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत. उपिंदर म्हणाल्या की, "परिवहन मंत्री लालजीत सिंह भुल्लर यांनी माझ्या पतीला खूप जास्त टॉर्चर केलं. माझे पती इतके हतबल झाले होते की, त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. जर माझ्या कुटुंबाला काहीही झालं तर त्याला हे सरकार जबाबदार असेल."
शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये रंधावा स्वतः सांगत आहेत की, त्यांनी विष घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये रंधावा यांनी मंत्री भुल्लर यांनी छळ केल्याचा आरोप केला होता. रंधावा यांच्याकडे 'पट्टी' क्षेत्राचा अतिरिक्त कार्यभार होता. उपिंदर कौर पुढे म्हणाल्या की, "माझ्या पतीला धमकावण्यात आलं होतं की तुझं कुटुंब, तुझी मुलं आणि पत्नी सर्वांना संपवून टाकू. त्यांच्या मागे गुंड लावण्याची धमकीही दिली गेली होती."
"१३ मार्च रोजी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना खूप त्रास देण्यात आला होता. मला तीन मुलं आहेत आणि सासू आहे. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. या प्रकरणात तातडीने अटक झाली पाहिजे, तरच आम्ही पोस्टमार्टम आणि अंत्यसंस्कार होऊ देऊ" अशी भूमिका पत्नीने घेतली आहे. १३ मार्च रोजी जेव्हा पती घरी परतले, तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगितली होती. त्यांनी आपल्या विभागाकडेही तक्रार केली होती, पण तिथून फक्त आश्वासनं मिळाली, कारवाई काहीच झाली नाही.
"हे सर्व फक्त एका टेंडरमुळे झालं. ते टेंडर मंजूर करण्यास माझ्या पतीने नकार दिला होता, म्हणून त्यांचा छळ करण्यात आला. आता मला स्वतःच्या आणि मुलांच्या जीवाची भीती वाटत आहे. आम्हाला सुरक्षा दिली जावी" अशी मागणी पत्नीने केली आहे. या घटनेमुळे पंजाबच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.