Trained student molested, Baramati pilot charged | प्रशिक्षित विद्यार्थिनीचा विनयभंग, बारामती येथील वैमानिकावर गुन्हा दाखल

प्रशिक्षित विद्यार्थिनीचा विनयभंग, बारामती येथील वैमानिकावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देविद्यार्थिनीच्या पालकांनी पुणे ग्रामीण अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली होती तक्रार आरोपीविरोधात गुन्हा दाखल; अद्यापही अटक झालेली नाही

बारामती : बारामती येथील कार्व्हर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या राष्ट्रीय स्तरावरील खासगी संस्थेतील प्रशिक्षकाविरोधात विनयभंग केल्याची तक्रार प्रशिक्षित विद्यार्थिनीने बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे .त्यानुसार याप्रकरणी चिफ पायलट विवेक आगरवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीस अद्यापही अटक झालेली नाही.

संबंधित प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीच्या पालकांनी पुणे ग्रामीण अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली होती .त्याची दखल घेऊन पोलीस अधिक्षक पाटील यांनी याबाबत दौंड उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना चौकशीचे आदेश दिले होते. शर्मा यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रशिक्षित ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार कार्व्हर एव्हिएशन प्रा.लि.बारामती येथे ही विद्यार्थिनी कर्मशियल पायलटचे प्रशिक्षण घेत होती .

दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या विद्यार्थिनीचे सोलोचे प्रशिक्षण होते. हे प्रशिक्षण सुरू असताना सीएफआय कॅप्टन विवेक फ्लाईंग करीत होते. यावेळी विद्यार्थिनीचा उजवा हात थ्रॉटलवर होता. त्यावेळी आरोपीने विद्यार्थिनीचा थ्रॉटलवरील हात पकडला.यावेळी एअरक्राफ्टचे पावर कमी जास्त होत असल्याने आरोपीने हात पकडला असेल म्हणून विद्याथीर्नी त्यांना काही बोलली नाही. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास विद्यार्थिनीला आरोपी फ्लाईगसाठी घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी पुन्हा तिचा हात पकडला व तिच्या दंडावर थोपटून आप अच्छा कर रही हो, असे म्हणाले. त्यावेळी आरोपीने आनंदाच्याभरात स्पर्श केला असेल असे वाटून विद्यार्थिनीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास पुन्हा तिला फ्लाईगसाठी घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी तिचा पुन्हा थ्रॉटलयरवरील हात पकडला. त्यावेळी मी त्यांना काही एक बोलले नाही.
त्यानंतर दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुन्हा मला फ्लाईगसाठी घेवुन गेले. आमची फ्लाईट टेक ऑफ झाल्यानंतर त्यांनी माझा पुन्हा हात धरला व माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल असा हात फिरवला.
त्यावेळी मी त्यांना म्हणाले की, सर मला अनकम्फर्टेबल वाटत आहे. मला फ्लाईट लॅन्ड करावयाचे आहे असे म्हणून मी त्यांना फ्लाईट लॅण्ड करायला लावली. त्याच दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास पुन्हा मला फ्लाईगसाठी घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी त्याचे सीट पाठीमागे घेऊन मी फ्लाईट व्यवस्थित चालवते का? हे पाहत होते. म्हणून मला वाटले की, दुपारी जो प्रकार झाला तो मला आवडलेला नाही म्हणून ते शांत बसले असावेत.त्यानंतर (दि.५) रोजी नेहमीप्रमाणे दुपारी मला फ्लाईंगसाठी घेवुन गेले.फ्लाईट टेक ऑफ झालेवर ते पुन्हा माझा हात धरत होते. त्यावेळी मी त्याचा हात झटकला. थोड्यावेळाने आम्ही फ्लाईट लॅण्ड केली. त्यावेळी त्यांनी माझ्या  मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.त्यानंतर याबाबतची तक्रार संस्थेच्या व्यवस्थापनासह पोलिसांकडे केली आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करीत आहे.याबाबत कार्व्हर व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, याप्रकरणाच्या चौकशीसाठी अंतर्गत कमिटीची नेमणूक केली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौकशीची प्रगती प्रलंबित असून यानंतर जो काही निर्णय येईल, तो आम्हाला मान्य असेल असे अधिकृत सुत्रांनी सांगितले.

Web Title: Trained student molested, Baramati pilot charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.