2 मिनिटांत 100 वेळा भोसकलं, तिहारमध्ये गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या; हत्येचा CCTV समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 21:04 IST2023-05-04T20:59:30+5:302023-05-04T21:04:32+5:30
Tillu Tajpuriya Murder: 5-6 हल्लेखोरांनी 2 मे रोजी तिहार तुरुंगात टिल्लू ताजपुरियाची निर्दयीपणे हत्या केली.

2 मिनिटांत 100 वेळा भोसकलं, तिहारमध्ये गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या; हत्येचा CCTV समोर
Tillu Tajpuriya Murder CCTV Footage:दिल्लीतील तिहार तुरुंगात मंगळवारी (2 मे) कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरिया याची 7-8 जणांनी निर्घृण हत्या केली होती. त्याच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. ताजपुरिया याच्यावर धारदार शस्त्राने 90-100 वार केल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्येही 7-8 जण ताजपुरियावर सपासप वार करताना दिसत आहेत. हा संपूर्ण हल्ला अवघ्या दोन मिनिटांत झाला. कारागृह कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चार हल्लेखोरांना पकडले.
कुख्यात गोगी टोळीच्या चार कथित सदस्यांनी मंगळवारी सकाळी टिल्लू ताजपुरिया याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. विशेष म्हणजे, 2021 मध्ये रोहिणी कोर्टात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत ताजपुरिया आरोपी होता, ज्यामध्ये गँगस्टर जितेंद्र गोगी मारला गेला होता. तिहार तुरुंगात मंगळवारी झालेल्या ताजपुरियाच्या हत्येच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुंड ताजपुरियाची निर्घृणपणे हत्या करताना स्पष्टपणे दिसत आहे. गोगीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच ही हत्या झाल्याची माहिती आहे. (हत्येचा व्हिडिओ अतिशय भीषण असल्यामुळे आम्ही तो दाखवू शकणार नाहीत.)
हत्येची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती
हल्ल्यानंतर जखमी ताजपुरिया याला दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले की, तळमजल्यावरील वॉर्डमध्ये बंद असलेल्या 33 वर्षीय टिल्लू ताजपुरिया याच्यावर गोगी टोळीच्या हल्लेखोरांनी सकाळी 6.15 वाजता हल्ला केला. हल्लेखोर-दीपक उर्फ तीतर, योगेश उर्फ टुंडा, राजेश आणि रियाझ खान हे त्याच वॉर्डातील पहिल्या मजल्यावर बंद होते.
अशी झाली हत्या
हल्लेखोरांनी अतिसुरक्षा असलेल्या वॉर्डच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी सळ्या कापल्या आणि चादरीच्या सहाय्याने खाली ताजपुरियाच्या वॉर्डजवळ आले. ताजपुरियाने हल्लेखोरांना पाहिल्यानंतर तो रोहित नावाच्या दुसर्या कैद्याच्या सेलमध्ये धावला. रोहितने आपल्या कोठडीचा दरवाजा बंद करून ताजपुरियाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून दरवाजा बंद होऊ शकला नाही, त्यामुळे हल्लेखोर आतमध्ये घुसले आणि यावेळी रोहितही जखमी झाला.