कपाळावर गंध; कीर्तनात सहभाग अन् दानपेटीवर डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:46 IST2019-10-01T18:36:47+5:302019-10-01T18:46:54+5:30

दागिने, पितळी घंटा जप्त

Tilak on the forehead; participation in kirtan but Eye on charity funds | कपाळावर गंध; कीर्तनात सहभाग अन् दानपेटीवर डोळा

कपाळावर गंध; कीर्तनात सहभाग अन् दानपेटीवर डोळा

ठळक मुद्दे मंदिरात चोरी करणारा आरोपी जेरबंद१७ हजाराचा मुद्देमाल जप्त

जालना : कपाळावर गंध, कीर्तनात सहभाग, देवासमोर आगरबत्ती लावणे आदी धार्मिक विधीचे सोंग करीत सहा मंदिरातील दानपेट्या, पितळी घंटा, समई चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई २८ सप्टेंबर रोजी करण्यात आली असून, त्याच्याकडून १७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायलयीन कोठडी सुनावली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांचे सहकारी २७ सप्टेंबर रोजी रात्री गस्तीवर होते. जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेकॉर्डवरील आरोपी बाबासाहेब नारायण वांगे (रा. संजयनगर जुना जालना) हा दिसून आला. पोलिसांना पाहताच पळून जाणाऱ्या वांगे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्याच्याकडे लॉक तोडण्यासाठीचे लोखंडी रॉड, पक्कड, स्क्रूड्रायव्हर असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. तसेच नारळ, आगरबत्ती, माचिस, हळद-कुंकू आदी पुजेचे साहित्यही मिळाले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर वांगे याने आपण मंदिरात चोरी करण्यास जात असल्याची कबुली दिली.

वांगे याने जालना येथील अंबड रोडवरील जोगेश्वरी नगर भागातील साई मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैसे लंपास केले होते. तसेच एकूण सहा मंदिरात त्याने हात साफ केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वांगे याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, पोउपनि दुर्गेश राजपूत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, पोना गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, रंजित वैराळे, पोकॉ सचिन चौधरी, विलास चेके, किशोर जाधव यांच्या पथकाने केली. अधिक तपास पोहेकॉ सॅम्युअल कांबळे हे करीत आहेत.

दागिने, पितळी घंटा जप्त
स्थानिक गुन्हे शाखेने तपासात मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या घरी कारवाई करून १० हजार ५०० रूपये, चार हजार रूपये किंमतीचे दागिने, तीन पितळी घंटा, दोन समई असा एकूण १७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या मंदिरात केली चोरी
जालना शहरातील अंबड रोडवरील साई मंदिरातील दानपेटीतील रक्कम, नाव्हारोडवरील मंदिरातील पितळी घंटा व समई, बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील हनुमान मंदिरातील पितळी घंटा व समई, गोंदी येथील अडभंगनाथ महाराज मंदिरातील दानपेटीतील पैसे, गोलापांगरी येथील तुळजाभवानी माता मंदिरातील सोन्याचे दागिने व पेटी फोडून चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

Web Title: Tilak on the forehead; participation in kirtan but Eye on charity funds