आमदारांना ‘टार्गेट’ करणारा ‘तिहार रिटर्न्ड’ नीरजसिंह राठोडला पाच दिवसांची पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 13:15 IST2023-05-19T13:14:54+5:302023-05-19T13:15:56+5:30
तो तिहार तुरुंगात कैददेखील होता व बारावी फेल असूनदेखील त्याने आमदारांना गंडविण्याचा ‘प्लॅन’ रचला.

आमदारांना ‘टार्गेट’ करणारा ‘तिहार रिटर्न्ड’ नीरजसिंह राठोडला पाच दिवसांची पोलिस कोठडी
नागपूर : अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यानंतर मंत्रिपदाचे आमिष दाखवत आमदारांना जाळ्यात ओढणारा गुजरातमधील नीरजसिंह राठोड याला गुरुवारी नागपुरात आणण्यात आले. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान पहिल्याच दिवशी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्याने सुमारे १६ आमदारांना फोनवरून संपर्क केल्याची बाब स्पष्ट झाली असून त्याच्याविरोधात अगोदरदेखील फसवणुकीचे गुन्हे दाखल होते. तो तिहार तुरुंगात कैददेखील होता व बारावी फेल असूनदेखील त्याने आमदारांना गंडविण्याचा ‘प्लॅन’ रचला.
राठोड याने भाजपच्या केवळ सहाच नाही, तर १६ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केले होते. यात मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे, जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे, तसेच गोवा येथील आमदार प्रवीण अगलेकर आणि नागालँडचे आमदार बाशा चँग यांचा समावेश आहे. इतर आमदारांची नावे समोर येऊ शकलेली नाही. पोलिसांनी गुरुवारी त्याला नागपुरात आणल्यावर न्यायालयासमोर उभे केले. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दिल्लीत गुन्हे दाखल
चौकशीदरम्यान त्याने आमदारांना फोन लावून पैसे मागितल्याची बाब कबूल केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याचा हा पहिलाच गुन्हा नाही. बारावी नापास असलेल्या या ठकबाजाने दिल्लीतदेखील काही जणांना फसविले होते. त्याच्याविरोधात तेथेदेखील गुन्हे दाखल झाले होते. त्याला काही काळ तिहार तुरुंगातदेखील ठेवण्यात आले होते. तेथून तो १४ जानेवारी रोजी बाहेर निघाला व त्यानंतर त्याने आमदारांना गंडविण्याचा ‘प्लॅन’ रचला.